सेवाव्रती: शिबानी जोशी
‘दिव्यांग’ हे देशाचे नागरिक असून त्यांनाही समान अधिकार असतात. ते देशाची संपत्ती आहेत. त्यांनाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण, प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देणे तसेच त्यांच्या विकलांगतेनुसार त्यांना सक्षम बनवणे, या विचाराने नागपूरमधील अनेकजण प्रेरित होऊन एकत्र आले. त्यांनी सुरुवातीला केवळ अंध व्यक्तींसाठी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू सर्वच प्रकारच्या विकलांगतेसाठी कार्य करण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. त्यातूनच दिव्यांगांसाठी विविध प्रकारची कार्ये हाती घेण्याचे ठरविले आणि त्यासाठी २० जून २००८ ला स्थापन झाली. एक ‘अपेक्स’ संस्था म्हणजे ‘सक्षम’. सक्षमचे पूर्ण नाव आहे ‘समदृष्टी, क्षमता, विकास एवं अनुसंधान मंडळ’. नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की अंध, अपंग, विकलांग, शारीरिक – मानसिकदृष्ट्या अपंग, आदी सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविणारी एक शिखर संस्था म्हणून ‘सक्षम’ काम करते. सक्षमचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे.
‘सक्षम’तर्फे दिव्यांगांसाठी प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन, साहित्य निर्मिती, रोजगार, तसेच क्रीडा, कला उपलब्ध करून देणे आणि दिव्यांगांचे आरोग्य, स्वावलंबन, सामाजिक विकास, विकलांगता निवारण अशा विषयांवर प्रत्यक्ष कार्य करणे येथे चालते. त्याशिवाय दिव्यांगांच्या अधिकारांचे संरक्षण, आरक्षण यासाठीही काम केले जाते. याचे सुरुवातीचे उदाहरण म्हणजे ‘माधव नेत्र बँक’. येथे नागरिकांना नेत्र दानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रचार केला जातो आणि दृष्टी प्रदान करण्यासाठी ग्राफ्टिंग सुद्धा केले जाते. ‘सक्षम’द्वारे आत्तापर्यंत महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ व देशातल्या विविध भागांत बारा लायसन्स प्राप्त नेत्रबँक स्थापन केल्या आहेत. आत्तापर्यंत १४ नेत्र बँक, १२ नेत्र संग्रह केंद्र, २४ जागरूकता केंद्र आहेत. माधव नेत्रालयाला श्रीलंकेच्या प्रतिनिधी मंडळांनी भेट देऊन तिथल्या कामाचे कौतुक केले आहे. नेत्र दानाचे महत्त्व लोकांना पटवून सांगण्यासाठी दरवर्षी नेत्रदान पंधरवडा आयोजित केला जातो.
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदानासाठी अनेक शिबिरे व व्याख्यानांचे आयोजन केले जाते. नेत्रदानाच्या या निरंतर प्रचार, प्रसारामुळे देशभरात आत्तापर्यंत ३५०० हून अधिक नेत्रदान झाली आहेत आणि त्यातून १०००हून अधिक लोकांना दृष्टी बहाल झाली आहे. देशभरात नेत्रदानाप्रती जागरूकता निर्माण व्हावी आणि कमीत कमी एक लाख लोकांनी नेत्रदानासाठी अर्ज भरावेत याकरता एक वर्ष ‘नेत्रदान रेल यात्रा’ काढण्यात आली होती. अंधांना ज्ञानाचे भांडार उपलब्ध व्हावे यासाठी ऑडिओ बुक्स लायब्ररी उभ्या केल्या गेल्या आहेत. सक्षमच्या नागपूर शाखेद्वारे आत्तापर्यंत पंधरा हजारांहून अधिक कॅसेटवर ५०० हून अधिक पुस्तके रेकॉर्ड करण्यात आली आहेत. नेत्रहीन विद्यार्थ्यांना ही पुस्तकं निशुल्क उपलब्ध करून दिली जातात. गृहिणी, सेवानिवृत्त लोक, शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील लोक स्वतः या पुस्तकांचे रेकॉर्डिंग आपल्या आवाजात करून देतात.
‘सक्षम’तर्फे ब्रेल ग्रंथ निर्माण केंद्र सुरू आहे. जीवनमूल्य शिकविणारे साहित्य निर्माण करण्यासाठी सक्षमच्या शाखा कार्य करीत आहेत. या ठिकाणी संगणकाच्या माध्यमातून ब्रेल लिपीमध्ये पुस्तक तयार केले जाते. यात स्वयंसेवक – विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने हातभार लावतात. त्यांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाते. त्यांच्या योगदानातून आत्तापर्यंत १८० हून अधिक पुस्तके ब्रेललीपीमध्ये तयार झाली आहेत. विशेषतः मराठी व हिंदीतील संस्कारक्षम व दर्जेदार ब्रेललिपीतील ग्रंथांचे रेकॉर्डिंग केले जाते. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला ‘दासबोध’, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची ‘ग्रामगीता’, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, प्रसिद्ध पक्षी प्रेमी मारुती चितमपल्ली यांची पुस्तके आणि अभ्यासक्रमातील पुस्तके यांचा यात समावेश आहे.
दिव्यांगांना नुसतेच शिक्षण किंवा प्रशिक्षण देऊन उपयोग नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी देखील काही उपक्रम राबविले जातात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे कृष्णज्योती अगरबत्ती निर्माण केंद्र. केरळमधल्या पलक्कड येथे ‘सक्षम’चे हे केंद्र चालते. या ठिकाणी अंध व्यक्ती उदबत्ती, साबण बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन आपली उपजीविका करतात. ‘सक्षम’चा दिव्यांगांसाठी आणखी एक उपक्रम म्हणजे दृष्टिबाधित महिला छात्रावास. केरळमधल्या कालडी येथे अंध विद्यार्थी आणि महिलांसाठी हे छात्रावास चालवले जाते. येथे अंध विद्यार्थ्यांना आणि महिलांना सन्मानजनक आयुष्य जगण्याची संधी दिली जाते.
अंध – अपंगांमध्ये अनेक कलागुण असतात. फक्त त्या कलांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळण्याची गरज असते. भक्ती संगीताचा एक ग्रुप केरळमधल्या पलक्कड येथेही आहे. सूरदास भक्ती मंडळी या ग्रुपद्वारे अंध व्यक्ती भक्ती गीत सादर करून उपजीविकाही करत आहेत. दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर सल्ला देता यावा यासाठी कायदेविषयक सल्ला कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे कायदेशीर सल्ल्याबरोबरच दिव्यांगांचे समुपदेशनही केले जाते. अंध व्यक्तींचे मनोरंजन व्हावे यासाठी विशेष स्वरूपाचे मनोरंजन केंद्र उभारण्यात आले आहे. आणखी एक योजना म्हणजे अल्पदृष्टी संवर्धन केंद्र. हा असा एक विषय आहे ज्याविषयी आपल्या देशातील सर्वसामान्यांना फारच कमी ज्ञान आहे. दृष्टिदोष आणि अंधत्व याच्या मधला टप्पा म्हणजे अल्पदृष्टी असे म्हणता येईल. ही विकलांगता चष्म्याने किंवा औषधाने बरी करता येऊ शकत नाही. खरंतर आपल्या देशात ७५ ते ८० टक्के अंध अल्पदृष्टीच्या समस्येचा सामना करीत असतात.
पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर कै. रमेश साठे यांनी या विषयावर संशोधन करून अनेक अल्पदृष्टी उपकरणे विकसित केली आहेत. त्याद्वारे अशा बाधितांवर उपचार होऊ शकतात हे कळल्यावर विजया मेमोरियल ट्रस्ट, पुणे यांच्या सहकार्याने नागपूरमध्ये एक अल्पदृष्टी मूल्यांकन व समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामुळे नागपूरमधल्या अनेक लोकांना या उपचार पद्धतीचा लाभ मिळाला आहे. नागपूर जिल्हा विभागातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक पातळीवर अल्पदृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून सक्षमतर्फे त्यांच्या क्षेत्रात जाऊन अल्पदृष्टी मूल्यांकन शिबिरे आयोजित करण्यात आली. त्याद्वारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यातल्या ६५ ते ७० विद्यार्थ्यांचा लाभ झाला. सध्या सक्षमतर्फे नागपूर, कल्याण, कोल्हापूर आणि हरियाणा इथल्या अंबाला इथे अशाप्रकारे केंद्र चालवली जात आहेत.
अल्पदृष्टी शिबिरांच्या माध्यमातून असे लक्षात आले की तपासलेल्यांपैकी २५ टक्के बालक-बालिकांच्या डोळ्यांत तिरळेपणा आहे. यावर उपचारासाठी ‘सुदर्शन-समदृष्टी’ हा प्रकल्प प्रारंभ करण्यात आला. ज्याच्या माध्यमातून आजवर १००० बालकांच्या डोळ्यांना निःशुल्क शल्यक्रिया करून डोळे सरळ करण्यात आले. ‘सक्षम’तर्फे देशभरात पसरलेल्या विविध संस्थांमध्ये काही कार्यक्रम नियमितपणे दरवर्षी साजरे केले जातात. यामध्ये अंधांसाठी उपयुक्त ठरलेल्या ब्रेल लिपीचे जनक ब्रेल यांची ५ जानेवारीला जयंती साजरी केली जाते. ब्रेल लिपी वाचन, लेखन स्पर्धा शिबीर असे कार्यक्रम सक्षमतर्फे दरवर्षी आयोजित केले जातात. संत सूरदास हे सुद्धा अंध होते आणि कृष्ण भक्त होते. त्यांनी आपल्या भक्तीमुळे श्रीकृष्णाची भजनं, साहित्य लिहिलं. संत सूरदास केवळ अंधांसाठीच नाही तर डोळस व्यक्तींसाठी सुद्धा अभ्यासाचा विषय ठरले आहेत. त्यांची जयंती ही साजरी केली जाते. त्याशिवाय माणसा माणसातील संबंध दर्शवणारा रक्षाबंधनचा सण तसेच सक्षम स्थापना दिवस २५ जून रोजीही साजरा केले जातात. जागतिक अपंग दिन ही डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो.
अपंग व्यक्तींसह प्रत्येक व्यक्तीला अनुभव घेण्याचा, शिक्षणाचा हक्क आहे असं सक्षम नेहमीच मानंत आलं आहे. त्यामुळे या अपंगांसाठी पर्यटनाचंसुद्धा आयोजन करण्यात येत. या “अनुभव यात्रां”च्या श्रुंखलेत ५६ दृष्टिहीन व्यक्तींना एक वन्य सहल घडवून आणली गेली होती. त्यावेळी प्रसिद्ध लेखक मारुती चित्तमपल्ली यांच्या एका पुस्तकाचं ब्रेल लिपीत प्रकाशनही करण्यात आलं होत. तसेच १९ दृष्टिदिव्यांगांना गंगोत्री यात्रेलाही पाठवण्यात आलं होत. त्यानंतर दिव्यांगांना समुद्रदर्शन व्हावे यासाठी दृष्टी बाधित आणि अस्थिबाधित व्यक्तींना गोव्याला पाठवण्यात आलं होत. दरवर्षी जागतिक संग्रहालय दिनी दृष्टिदिव्यांगांना नागपुरचे मध्यवर्ती संग्रहालय दर्शन आयोजित करण्यात येते.
वर्धामध्ये एका शिबिरात ७०००० नागरिकांचे डोळे तपासण्यात आले आणि यावेळी ७५०० जणांमध्ये मोतीबिंदू दिसून आला. त्यातील २५०० लोकांची मोतीबिंदूची निःशुल्क सर्जरी करून देण्यात आली होती. तसेच प्रयाग राज येथील कुंभमेळ्यात ‘नेत्रकुंभ’ या उपक्रमांद्वारे २२०००० लोकांची व हरिद्वार कुंभमेळ्यात ७५००० लोकांची नेत्रतपासणी करून एकूण १,७०, ००० लोकांना निःशुल्क चष्मे वाटप करण्यात आले. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ऑडियो बुक्स सक्षमचे कार्यकर्ते रेकॉर्ड करून रेकॉर्डिंग उपलब्ध करून देतात. त्यासाठी नागपूर येथे ‘दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन’ सोबत संयुक्त उपक्रमांतर्गत एक रेकॉर्डिंग स्टुडिओ स्थापन करण्यात आला आहे. याच सेट अपद्वारे दृष्टिदिव्यांगांसाठी एक इन्टरनेट रेडिओ ‘रेडिओ अक्ष’ या नावाने प्रारंभ करण्यात आला आहे.
दिव्यांगांच्या सेवेची पूर्तता त्यांना आर्थिकरीत्या स्वयंसिद्ध केल्याशिवाय होत नाही हे लक्षांत घेऊन ‘सक्षम दिव्यांग रोजगार मार्गदर्शन केंद्र’ या प्रकल्पाद्वारे आजवर सुमारे ५२५ दिव्यांगांना व स्वयंरोजगाराद्वारे ४० दिव्यांगांना दिव्यांगांना खासगी क्षेत्रांत नोकरी मिळवून देऊन आत्मनिर्भर करण्यात आले आहे. माधव नेत्रपेढीच्या स्थापनेपासून नागपूर येथे एक अद्ययावत नेत्रालय उभे राहावे ही योजना होती. तद्नुसार वर्ष २०१३ मधे एक अद्यावत सोयींनी परिपूर्ण असे माधव नेत्रालय स्थापन करण्यात आलय. तसेच नागपूर घ्या वासुदेव नगर येथे एक नेत्रचिकित्सा केंद्र स्थापित करण्यात आले.
भविष्यकाळातील योजना :
दृष्टिबाधित संचालित फिजियोथेरेपी, मसाज, एक्यूप्रेशर केंद्र सुरू करायचं आहे. अंध व्यक्तींना प्रशिक्षित करून ते सुद्धा इथे सेवा देऊ शकतील आणि रोजगार त्यांना उपलब्ध होऊ शकेल यासाठी अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्याची ‘सक्षम’ची योजना आहे. वर्धा जिल्ह्यातील दिवंगत ॲड. पंजाब शिरभाते यांनी स्पीच थेरपीमध्ये एक नवी ‘प्रयास पद्धती’ संशोधित केली आहे. या पद्धतीने उपचार करून पूर्णतः श्रवण बाधित २५ जणांना संवाद करण्यात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या पद्धतीच्या माध्यमातून स्पीच थेरपी सेंटर सुरू करण्याची ही ‘सक्षम’ची योजना आहे. ‘सक्षम’, समदृष्टी, क्षमता, विकास एवं अनुसंधान मंडळ’ ही राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांनी अंध, अपंग, दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या संस्थांची एक शिखर संघटना आहे असे म्हणता येईल. या ‘अपेक्स’ बॉडीअंतर्गत अपंगांसाठीची विविध कार्ये उपरोक्तानुसार चालत असतात.
joshishibani@yahoo. com
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…