Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीRaja Shivaji : शिवजयंतीनिमित्त रितेश-जेनेलियाकडून मोठी घोषणा!

Raja Shivaji : शिवजयंतीनिमित्त रितेश-जेनेलियाकडून मोठी घोषणा!

नवी कलाकृती येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील रितेश (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखची (Genelia Geshmukh) जोडी खूप लोकप्रिय आहे. आजवर या जोडीने वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांचं भरभरुन प्रेम कमावलं. त्यांनी एकत्र ‘लय भारी’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट केला होता आणि तो प्रचंड गाजला. यानंतर गेल्यावर्षी आलेल्या ‘वेड’ चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. यात रितेश आणि जेनेलिया प्रमुख भूमिकेत होते. यानंतर आता या दोघांची मिळून एक नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवजयंतीनिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) नव्या चित्रपटाची त्यांनी घोषणा केली आहे.

रितेश आणि जेनेलियाने आपापल्या अकाऊंटवरुन त्यांच्या नव्या ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशने केलं आहे तर या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जेनेलिया यांनी केली आहे.

जेनेलियाची पोस्ट

जेनेलियाने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला तिने कॅप्शन दिलं, “गेली कित्येक वर्ष आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चरित्रपट पडद्यावर साकारता यावा हे स्वप्न उराशी बाळगून होतो. हे शिवधनुष्य पेलतांना एक भव्य चित्रपट साकारावा फक्त इतकाच हेतू नाही. हे एक असं राजवस्त्राचं नाजूक वीणकाम आहे ज्यात आपल्या इतिहासाची भव्यता आणि आपल्या संस्कृतीची समृद्धता आहे.‘राजा शिवाजी’ हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न. हे साकारत असतांना, ज्यांना अद्वितीय कामं करण्याचा ध्यासच आहे असे ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडीओ आमच्या साथीला आहेत. याहून सक्षम साथ असूच शकत नव्हती. ही शिवगाथा सांगणं हा आमच्यासाठी सन्मान तर आहेच पण त्याहून मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला नम्र जाणीव आहे. आजच्या पवित्र दिनी आई जगदंबा, छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही तुमच्या शुभेच्छा पाठीशी असतील अशी आशा करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रितेशची पोस्ट

रितेशने देखील ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्याने कॅप्शन दिलं, “इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जिचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तीनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे. शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे… राजा शिवाजी”, असं रितेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

२०२५ मध्ये ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार की रितेश स्वत: छत्रपतींची भूमिका साकारणार? याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच या चित्रपटात कोणती स्टारकास्ट असणार याबाबत देखील प्रेक्षक उत्सुक आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -