Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीShivneri Bus : आता 'अटल' सेतूवरुन पुणे-मंत्रालय/दादर शिवनेरी बस धावणार

Shivneri Bus : आता ‘अटल’ सेतूवरुन पुणे-मंत्रालय/दादर शिवनेरी बस धावणार

मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यानच्या नव्या “अटल सेतू “वरून (Atal Setu) एसटीची पुणे-मंत्रालय/दादर अशी शिवनेरी बस (Shivneri Bus) सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून दररोज सकाळी पुणे स्टेशन-मंत्रालय (सकाळी ६.३०) आणि स्वारगेट-दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत.

या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परत ११ वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे.

तिकीट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी प्रवाशांनी शिवनेरी बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

दरम्यान, मुंबईवरुन पुण्याला जाताना अटल सेतूचा वापर केल्यामुळे पनवेल एसटी स्थानक वगळावे लागणार आहे. पनवेलसह अन्य लहान-मोठे थांबेही घेता येणार नाहीत. त्यामुळे आता शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेण्याचा पर्याय कितपत यशस्वी ठरतो, हे पाहावे लागेल.

शिवडी- नाव्हाशेवा अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांकडून २५० रुपये इतका टोल आकारला जातो. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या शिवनेरी बसचे तिकीट वाढणार का, हा प्रश्न होता. परंतु, एसटी महामंडळाने अटल सेतूवरुन धावणाऱ्या शिवनेरी बसेससाठी तिकीट दरात कोणताही बदल केलेला नाही. अटल सेतूवरुन मुंबईतून निघालेली बस अवघ्या २० मिनिटांत सिग्नलमुक्त मार्गाने चिर्ले येथे पोहोचणे शक्य होणार आहे. चिर्लेहून ६० किमी अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे. अटल सेतूच्या मार्गाने पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी भरते. याशिवाय, वाहतूक कोंडीची समस्या विचारात घेतल्यास शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेल्यास प्रवासाचा वेळ साधारण तासाभराने कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा अनुभव आता आणखी सुखकारक होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -