नियमानुसार चिन्ह देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी आणि पक्षाचे चिन्ह दिल्याविरोधात शरद पवार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावेळी अजित पवार गटानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाला जोरदार आक्षेप नोंदविला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने मतदार हुशार आहे, असे सांगत पुढील तीन आठवडे तेच नाव कायम राहणार असल्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रवादीचे नाव शरद पवारांच्या गटाला दिल्याने गोंधळ उडेल असा आक्षेप अजित पवारांच्या वकिलांनी घेतला आहे. यावर मतदार हुशार आहे, त्याला कोणाचा पक्ष असेल ते समजते. यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या नावावर आक्षेप असण्याचे कारण नाही, असे अजित पवार गटाला सुनावले.
शरद पवार गटाने मिळालेले नाव लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम रहावे, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. लोकसभा निवडणुकीला कमी काळ राहिला आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होईल, असे कारण यावेळी देण्यात आले. यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यांनी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. तसेच शरद पवार गटाला पक्ष चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यास सांगितले आहे. तसेच आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.