Tuesday, July 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजगडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करु. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विशेष अधिवेशन

मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन मंगळवारी घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. ३५०व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. ‘जाणता राजा’ महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आंदोलनाबाबत अधिसूचना जारी केली होती. मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. शासनाकडून तसं पत्रही जरांगे पाटील यांना देण्यात आलं होतं. या निर्णयाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. आता एक दिवसाच्या या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर कायदा पारित करण्याची शक्यता आहे. तसेच सगेसोयरे शब्दाच्या अनुषंगाने कायदा पारित करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनात आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला जातोय, याकडे मराठा समाजासह इतरांचेही लक्ष लागून राहीले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -