पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास, आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करीत आहोत. शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी रायगड किल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून अखंड हिंदुस्थानसोबत युरोपातील राज्यसत्तांना अचंबित केले. हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत. त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा, एकतेचा विचार येत्या पिढीला कळण्याचा निर्धार या जयंतीनिमित्त करुया.
सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांमध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्याकाळात शिवरायांनी पेरला. परकीय सत्तेसमोर सार्वभौम स्वराज्याची स्थापन करत रयतेला आपले वाटावे असे राज्य, स्वराज्य त्यांनी स्थापन केले, याची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे, असे ते म्हणाले.