
पुणे : आपल्या वेगळ्या कार्यशैलीने गुन्हेगारी जगतावर जरब बसवणारे सिंघम पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मागच्या आठवड्यात पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील ३२ टोळ्यांमधील तसेच रेकॉर्डवरील तब्बल २६७ गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांची परेड घेत त्यांना सज्जड दम दिला होता. तरीही पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आता पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरात समोर आला आहे. या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे.
महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.
पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुरवातीला महिलेच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली. त्यानंतर महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महिला घरात पळून गेल्याने थोडक्यात बचावली. मात्र पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला. ज्यात चारचाकी गाडीचे सीट जळाले.
पुण्यातील हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ज्यात दहा ते पंधरा जणांचं टोळकं वेगवेगळ्या दुचाकीवरून महिलेच्या गल्लीत येतात. वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या उभा करून ते महिलेच्या घराकडे जातात. या सर्वांच्या हातात लाठ्या-काठ्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहींनी तोंडाला रुमाल बांधल्याचे पाहायला मिळते. गाडीची तोडफोड केल्यावर काहीजण लगेचच पळून जातात. याचवेळी यातील एकजण महिलेच्या दिशेने पेट्रोल फेकतो. तसेच, हातातील माचीस पेटवून ती महिलेच्या घराकडे फेकतो. मात्र, सदर महिला घरात पळून गेल्याने कारला आग लागल्याचे दिसते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सर्वच आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परिसरात राहतात. त्या दोघांच्यामध्ये पार्किंगवरून वाद सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद भडकला आणि १३ जणांनी येऊन राजे यांची एक चारचाकी गाडीची तोडफोड करून नुकसान केले. त्याठिकाणी असलेली एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली. महेश राजे यांची भाडेकरू असलेल्या महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यामुळे या महिलेच्या अंगावर आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.