ओंजळ: पल्लवी अष्टेकर
राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी स्वराज्य निर्मितीची स्फूर्ती जनतेच्या मनात चेतवली आणि यातूनच प्रेरणा घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य निर्मितीचा ध्यास निर्माण झाला. शिवाजी महाराजांनी रायरेश्वरच्या मंदिरात मेळावा भरवून, तोरणा किल्ला घेऊन स्वराज्य निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना अनेक मावळ्यांनी त्यांना साथ दिली. अनेक युद्धात प्राणपणाला लावून ते लढले. त्यात बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, शिवा काशीद, नेताजी पालकर, येसाजी कंक, सूर्याजी मालुसरे, भीमाजी वाघ अशा एक ना अनेक मावळ्यांचा समावेश आहे. या मावळ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे.
तानाजी मालुसरे यांचा जन्म १६२६ मध्ये गोडवली, सातारा येथे झाला. महाराष्ट्रातील ‘वाई’ हे नगर कृष्णामाईच्या काठावर वसलेले आहे. वाईतून पसरणीच्या घाटाकडे जंगलातून एक मार्ग जातो. या पसरणीच्या दुर्गम कपाऱ्यात वसलेले एक छोटे गाव म्हणजे गोडवली. गोडवली गाव असेल शंभर-सव्वाशे उंबरठ्यांचे. गावात काही पक्की व काही झोपडीवजा घरे होती. इथले लोक नैसर्गिक आप्पतींशी झुंज देत जीवन जगत आलेले. या गावात मालुसरे घराणे पिढ्यानपिढ्या नांदत आले होते. आजूबाजूला जंगल असलेल्या या गावातील लोक शूर, पराक्रमी वृत्तीचे होते. त्यांच्यात झुंज देण्याची अफाट प्रवृत्ती होती, ती त्यांना जणू सह्याद्री पर्वतानेच दिली होती.
गोडवलीचे ग्रामदैवत काळकेश्वरी देवी. या देवीवर मालुसरे घराण्याची श्रद्धा होती. जेव्हा जेव्हा यवनांचा, सैनिकांच्या लुटारू टोळ्यांचा किंवा चोर, दरोडेखोर यांचा घाला गावातील वस्त्यांवर यायचा तेव्हा या गावातील लोक मालुसरे यांच्याकडे यायचे. तोच त्यांना त्यांचा आधारवृक्ष वाटायचा. याच गावात काळोजीराव व पार्वतीबाई यांना महाशिवरात्रीच्या दिवशी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘तानाजी’ असे ठेवले. त्यानंतर दोन वर्षांनी सूर्याजीचा जन्म झाला. तानाजीचे वडील काळोजीराव हे आदिलशाही सैन्याच्या विरोधात मृत्युमुखी पडले. मुलांचे पितृछत्र हरविल्यावर पार्वतीबाईंचा भाऊ कोंडाजी शेलार आपल्या बहिणीला कुडपन येथे आपल्या भाच्यांसह घेऊन आला. तेथेही पार्वतीबाईंना यवनांचे येणे-जाणे नसावे असे वाटत होते. हीच भीती कोंडाजी शेलार यांना वाटत होती. कोंडाजी मामांच्या डोळ्यांसमोर एक व्यक्ती उभी राहिली. ही व्यक्ती म्हणजे जावळी खोऱ्यातील अप्पाजी कळंबे-पाटील.
जावळीलाच्या मध्ये संह्याद्रीचा अडसर असल्याने यवनसेना इकडे फिरकलीच नव्हती. इथे जंगली श्वापदांचे भय होते. मात्र अनेक शतके इथे राहणाऱ्या व जंगलच जीवन मानणाऱ्यांना ते भय उरलेच नव्हते. एके दिवशी अप्पाजी पाटलांशी बोलणे करून कोंडाजीमामा आपली बहीण पार्वतीबाई व दोन भाचे यांना घेऊन उमरठ्याला वास्तव्य करण्याच्या हेतूने आले. चंद्रगडाच्या जंगलातील लाकूडफाटा व पालापाचोळा गोळा करून, दगड-माती घेऊन कोंडाजीमामांनी निवारा उभा केला. तानाजी व सूर्याजी यांनी आपल्या मामा व आईला या कामात मदत केली. घराभोवती असलेल्या कुंपणावर बाभळी, बोराटी यांच्या काट्याकुट्यांचे आवरण घालून निवारा जंगली श्वापदांपासून सुरक्षित केला.
अप्पाजी पाटलांनी या कुटुंबीयांसाठी चंद्रगडाच्या पायथ्याशी जमीन दिली. उभय कुटुंबीयांनी अखंड परिश्रम घेऊन जमीन शेतीयोग्य बनविली. कोंडाजी मामांनी मुलांची मनं निर्मळ व सुसंस्कृत व्हावीत म्हणून भरपूर दक्षता घेतली. ते मुलांना सक्तीने तालमीत घेऊन जात. त्यांनी मुलांना तलवारबाजी व दांडपट्टा शिकवला. कोंडाजी मामांनी तानाजी, सूर्याजी यांच्या जडण-घडणीसाठी भरपूर कष्ट घेतले. मुलांचे वडील काळोजीराव शूरवीरतेचे, धाडसीपणाचे प्रतीक होते. ‘दिलेला शब्दं मोडायचा नाही’ व ‘आपल्या मनाशी व कर्तव्याशी प्रामाणिक’ राहण्याचा आदर्श काळोजीरावांनी मुलांपुढे ठेवला होता. पार्वतीबाईंनीही कधी कुणापुढे लाचारी पत्करली नाही.
शिवबांच्या छोट्या राज्याचा कारभार राजगडावरून सुरू झाला. तानाजी, येसाजी, सूर्याजी, कावजी, रूपाजी, संभाजी यांना
अनुभवी सेनापती माणकोजी दहातोंडे मार्गदर्शन करू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक लढायांमध्ये तानाजी यांनी जीवाची बाजी लावली. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून-पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार दादोजी कोंडदेव यांच्यावर आदिलशहा तख्ताने कोंढाण्याचा सुभा सोपविला होता. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर कोंढाण्याचा सुभा अमीन ठाणेदाराकडे सुपूर्द करण्याची आज्ञा विजापुरातून निघाली. कोंढाणा जर त्याच्याकडे हवाली झाला, तर ती स्वराज्यासमोरील अडचण ठरणार हे शिवबांनी समजून घेतले. स्वराज्यासाठी कोंढाणा आपल्या ताब्यात घेणे खूप जरुरीचे होते. कोंढाणा किल्ला चढण्यास अतिशय अवघड होता. लढा देऊन तो घेता येणे अतिशय कठीण होते. सिद्धी अंबर वाहवाचे तिथले सदैव अस्तित्व अडचणीचे ठरत होते. कोंढाण्याचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. त्याची नैसर्गिक ठेवण आगळी-वेगळी व किचकट होती. राजगडाच्या ईशान्येला अवघ्या सहा कोसांवर कोंढाणा होता. कोंढाणा स्वराज्यात दाखल झाला, तर त्याचा फार मोठा फायदा व उपयोग होणार याची जाणीव शिवाजी राजे व मावळ्यांना होती; परंतु गडाला वेढा देऊन कोंडी करून घेण्याएवढे मनुष्यबळ राजांकडे नव्हते. त्यामुळे राजांच्या पुढ्यात अनेक प्रश्न उभे ठाकलेले होते.
कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजीराजेंनी तानाजीवर सोपविली. ही लढाई जिंकण्यासाठी तानाजीने पाच हजार मुघल सैनिकांमागे केवळ ३४२ सैनिक निवडले. कोंढाणा किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी उदयभान राठोड याच्यावर होती. तानाजी व मावळ्यांनी कोंढाणा जिंकण्याची योजना आखली. अमावास्येच्या दाट अंधारात तानाजीने गडाचा अतिशय कठीण असा उभा भाग निवडला. आपल्या सैनिकांसह तानाजी यशवंती या घोरपडीच्या सहाय्याने वर चढले. अर्थातच मावळ्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नसल्यामुळे ते संकटावर मात करू शकले. हळूहळू सर्व सैनिकांनी किल्ल्यात प्रवेश केला.
तानाजीच्या नेतृत्वाखालील हल्ल्याने मुघल सैनिक बावरले. तानाजी व मावळ्यांनी हे युद्ध मोठ्या शौर्याने लढले व युद्ध लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. जेव्हा तानाजींना वीरगती मिळाली, तेव्हा हे युद्ध तिथेच थांबले नाही. त्यांचे मामा व भाऊ यांनी मिळून हे युद्ध लढले व कोंढाणा जिंकून स्वराज्याचा झेंडा फडकवून विजय पूर्ण केला. ज्या दिवशी तानाजींना वीरगती प्राप्त झाली तो दिवस होता, ४ फेब्रुवारी १६७०. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीचा गौरव ‘गड आला, पण सिंह गेला’ या शब्दांत केला. तानाजीच्या गौरवासाठी या किल्ल्याचे नामकरण ‘सिंहगड’ असे करण्यात आले.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…