Friday, November 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपोखरबावचे श्रीसिद्धिविनायक मंदिर

पोखरबावचे श्रीसिद्धिविनायक मंदिर

कोकणी बाणा: सतीश पाटणकर

गणेशाची प्रसिद्ध, ऐश्वर्यसंपन्न, भक्तांच्या गर्दीने गजबजलेली स्थळं सर्वांनाच माहीत असतात. पण काही मंदिरं या सगळ्या झगमगाटापासून दूर कुठे तरी रानावनात, डोंगरकपारींत, गडकिल्ल्यांवर एकटीच वसलेली असतात. आडवाट धरली की कितीतरी आश्चर्ये, निसर्गनवल, सौंदर्यस्थळे सामोरी येतात. सृष्टीकर्त्यां परमात्म्याची ही सारी निर्मिती पाहून थक्क व्हायला होते. त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. अशाच आडवाटेवरून फिरताना सुखकर्त्या गणेशाची विविध स्थाने, त्याची विविध रूपे नजरेस पडतात. हे आडवाटेवरचे गणेश अत्यंत शांत, रमणीय ठिकाणी वसले आहेत. गर्दी, गोंगाट काहीही नाही. देव आणि आपण यांच्यामध्ये कोणीही नाही. कितीही वेळ इथे थांबावे, त्याच्याशी संवाद साधावा, मन शांत करून घ्यावे आणि नवीन ऊर्जा घेऊन पुढे चालू लागावे. हे सगळे आडवाटेवरचे गणेश तुमच्यासमोर आणण्याचे प्रयोजन हेच आहे. मुद्दाम, आवर्जून त्यांना भेट द्यावी आणि मन:शांती अनुभवावी. काही वेगळे बघितल्याचा आनंद तर आहेच. पण या सर्व ठिकाणी देव भक्तांची वाट पाहत उभा आहे. गरज आहे आपण जरा वाट वाकडी करायची आणि त्या सुखकर्त्यांची भेट घेण्याची. देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर त्यापैकी एक आहे.

देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी त्या गणरायाचे दर्शन घडते. पोखरबाव इथे डोंगराला एक खूप मोठे नैसर्गिक छिद्र पडले आहे. त्याच्या खालून अव्याहत एक ओढा वाहत असतो. डोंगर पोखरला गेलाय म्हणून पोखर आणि खाली तळे, ओहोळ आहे म्हणून बाव त्यामुळे हे स्थान झाले पोखरबाव. इतिहासाच्या अभ्यासकांच्या मते, पोखरबावच्या गुहा अथवा लेणी हा अनमोल ठेवा आहे. तिठ्यावरून आत वळल्यावर मार्गालगतच अध्यात्माचे नितांतसुंदर शिल्प दृष्टीस पडते. अरबी समुद्राच्या काठावर प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरापासून अलीकडे २० किलोमीटर अंतरावर दाभोळेत श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर आहे.

पूर्वी, त्या स्थानी छोट्याशा दगडात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. काजरा आणि आंब्याच्या झाडांच्या पोखरीमध्ये गणेशाला वंदन केले जाई. झाडापासून जवळ एक विशाल गुहा होती. त्या गुहेजवळून हमरस्ता जायचा. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बैलगाडीतून वाहतूक केली जायची. बैलगाड्यांतून विजयदुर्ग बंदरातून निघालेले व्यापारी, शेतकरी गणरायाच्या सान्निध्यात घडीभर विसावायचे आणि पुढील प्रवास सुखाचा होवो यासाठी प्रार्थना करायचे. मग त्यांचा पुढील प्रवास सुरू व्हायचा. गणपतीच्या मूर्तीशेजारी असलेल्या त्या गुहेतील कुंडामधील बारमाही पाण्याचे स्रोत तेथून ये-जा करणाऱ्या वाटसरूंची तृष्णा शांत करायचे. कालपरत्वे, वाहतुकीची साधने बदलली. हमरस्त्यावरून वाहने धावू लागली आणि गणेशाची ख्याती सर्वदूर पसरू लागली.

पोखरबावच्या स्थानावर निसर्ग आणि परमेश्वर यांच्या सान्निध्यात क्षणभर सारे काही विसरायला होते. गणरायाला वंदन करून, उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर निसर्गरम्य वातावरणात स्वर्गीय सुख अनुभवता येते. समोर शेष, गोकर्ण, द्रौपदी आणि पांडव अशी नावे असलेली कुंडे दृष्टीस पडतात. ती कुंडे कोणी तयार केली याचे उत्तर कोणालाही सापडलेले नाही. मंदिर परिसरात पाण्याची वानवा नसते. कितीही कडक दुष्काळ पडो, तेथील पाणी कधीही संपलेले नाही. दाभोळे गावातील नदीचा उगम मंदिरापासून काही अंतरावर होतो. दाभोळेच्या डोंगरातून झिरपणारे पाणी तेथील गोमुखातून वर्षानुवर्षे वाहत आहे.

मंदिर परिसरात कासवाच्या पाठीवर शिवलिंग आहे, असा दृष्टान्त श्रीधर राऊत यांना १९७९ च्या दरम्यान झाला. त्यांनी ग्रामवासीयांना त्याबद्दल सांगितले. त्या जागी उत्खनन केले आणि खरोखरच, त्या ठिकाणी शिवलिंग दिसून आले. शिवलिंगाकडे उत्तर दिशेकडून पाहिल्यास विष्णूच्या वराह अवताराचा भास होतो, तर दक्षिणेकडून पाहिले असता कासवाच्या पाठीवर शिवलिंग असल्याचे पाहण्यास मिळते. आग्नेय दिशेकडून पृथ्वी आणि चंद्र यांचा भाग दिसतो. उत्खननादरम्यान तेथे कुंडेही सापडली असे राऊत सांगतात. उत्खननानंतर श्रीधर राऊत यांनी स्वत:ला गणेशसेवेसाठी पूर्णपणे झोकून दिले. गुहेच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता भाविकांना सुलभतेने गुहा पाहता यावी, अशी रचना तेथे करण्यात आली आहे. गुहेकडच्या भागात शेष आणि हनुमान यांचा आकार कोरण्यात आला आहे. त्यामुळे गणपती मंदिर आणि डोंगर जणू हनुमंताने त्याच्या हातावर पेलला असल्याचा भास होतो. दर संकष्टीला, विशेषत: अंगारीकेला तेथे भाविकांची गर्दी उसळते.

माघी गणेश जयंतीला तर तेथे जत्राच भरते. होम, गणेशयाग, पूर्णाहुती असे धार्मिक विधी होत असतात. जत्रा तीन दिवस सुरू असते. तेथे काही छोटी मंदिरेही बांधण्यात आली आहेत. पायऱ्या उतरून जलकुंडांकडे जात असताना गजानन महाराज, दत्त महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली पाहण्यास मिळते. गगनबावड्याचे गगनगिरी महाराजही त्या स्थळी आले होते. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांची प्रतिमाही तेथे लावण्यात आली आहे. मंदिराचा कारभार ट्रस्टच्या माध्यमातून चालतो. दाभोळेच्या सड्यावरून जात असताना एका ठिकाणी चित्त स्थिरावते. प्रवास सुरू असतो. घनदाट हिरवाईत चिमण्या पाखरांचा किलकिलाट, झऱ्याचा खळखळाट कानांवर पडतो आणि डोळ्यांसमोर येतो तो श्रीसिद्धिविनायक कासवाच्या पाठीवरचे शिवलिंग आणि नितळ निळ्याशार पाण्याच्या सान्निध्यात असलेली ‘पांडवां’ची कुंडे! गूढ असे ते वातावरण गजबजलेल्या जगापासून काही काळ खूप लांब आल्याचे समाधान देते. शांतता उपभोगता येते. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -