Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाज...म्हणून निर्माण झाले आनंद भवन!

…म्हणून निर्माण झाले आनंद भवन!

विशेष: मोहन शेटे, प्रख्यात इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणे ही समस्त शिवभक्तांसाठी आनंदाची पर्वणी असते. त्यातच यंदा त्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. असा सुमंगल काळ असताना अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर आकार घेत आहेत. अलीकडेच रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा भव्य आणि हृद्य कार्यक्रम आपण पाहिला. हा देखील एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल, कारण शिवाजी महाराजांच्या जीवनातही आपला धर्म, परंपरा, संस्कृती यांचा सन्मान राखण्याचे अनेक प्रसंग आपल्याला दिसतात. महाराजांच्या राज्याभिषेकाचे कौतुक तसेच राजांचे गुणगौरव करताना समर्थ रामदास स्वामी यांनी
“बुडाला औरंग्या पापी|
म्लेंच्छसंहार जाहला|
मोडीली मांडिली क्षेत्रे|
आनंदवनभुवनी॥”
असे उद्गार काढले होते. मूळ काव्यातील दुसऱ्या ओळीमध्ये रामदास स्वामींनी आपल्या जीवनकार्यात परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली श्रद्धास्थाने महाराजांनी पुन्हा मांडल्याचे म्हणजेच त्यांचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. त्यातील एक म्हणजे महाराज गोव्याला गेले असता प्रवासात त्यांना एक कथा समजली.

ती अशी की, तीनशे वर्षांपूर्वी गोव्यामध्ये कदंब नावाच्या राजांचे राज्य असून त्यांनीच तिथे सप्तकोटेश्वर नावाने महादेवाचे भव्य, सुंदर मंदिर बांधले होते. पुढे इस्लामच्या आक्रमणात मंदिराचा विद्ध्वंस झाला. त्यानंतर विजयनगरच्या राजांनी मंदिर पुन्हा उभारले, पण पोर्तुगीजांनीही या मंदिराची विटंबना केली. इतकेच नव्हे, तर तेथील शिवलिंग विहिरीवर अशा ठिकाणी बसवले की, त्यावर पाय दिल्याखेरीज लोकांना पाणीच काढता येऊ नये. यामध्ये ‘आम्ही तुमच्या दैवतांचा हवा तसा विद्ध्वंस करू शकतो’ हा आक्रमकांचा अहंकार होताच; खेरीज या श्रद्धास्थानांचे महत्त्व समजल्यामुळे एकदा हिंदू समाजाची ताकद असणाऱ्या या श्रद्धास्थानांचा, भक्तिस्थानांचा मानभंग केला, तर या समाजावर आपण हजारो वर्षे राज्य करू शकू, हे ते जाणून होते. एखाद्याचा कणा मोडल्यानंतर तो उभा राहू शकणार नाही, अगदी त्याच प्रकारे हिंदुस्थानचा कणा असणारी ही मंदिरे संपवली की हा समाज पायदळी तुडवता येईल हा विचार त्यांच्या कृतीतून प्रकट होत होता.

ही दुर्दैवी कथा समजल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना त्या महादेवाचे भव्य मंदिर बांधण्याची आज्ञा केली. त्यावरून ते शिवलिंग घेऊन स्वराज्यात जायचे आणि रायगड वा राजगडाच्या परिसरात मंदिर बांधायचे, असे काहींना वाटले. मात्र महाराजांनी हे मंदिर गोव्यात जिथे होते त्या स्थळीच उभे राहील, असे ठणकावून सांगितले. हे ऐकल्यानंतर आपण परतल्यानंतर पुन्हा त्याची विटंबना होण्याची शंका मंत्र्यांनी बोलून दाखवली. त्यावेळी महाराज म्हणाले, “भक्त दुबळे असतील, तेव्हाच देवाची विटंबना होते. आता हे शिवाजीराजाने बांधलेले देऊळ आहे. माझे राज्य नसणाऱ्या पोर्तुगीजांंच्या भूमीत मी ते बांधतो आहे. तरीही याची विटंबना करण्याची सोडा; याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचीही कोणाची हिंमत होणार नाही.” असे विचार असणारा राजा असल्यामुळे आज आपण आनंदाने आणि अभिमानाने सांगू शकतो की, त्यानंतर तीनशे वर्षे गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता असूनही या मंदिराची विटंबना करण्याची हिंमत झाली नाही. आजही विजयनगरच्या राजाने गोव्यातील नार्वे या गावी उभारलेले हे भव्य शिवमंदिर आणि तेथील शिवाजी महाराजांचा शिलालेख पाहू शकतो. असेच दुसरे उदाहरण महाराजांच्या तामिळनाडू प्रवासादरम्यानचे आहे.

तिथे तिरुवन्नमलयी नावाचे एक गाव आहे. तेथून प्रवास करताना त्यांना गावातील एक दुखद कथा समजली. ती म्हणजे तिथे शंकर आणि विष्णूचे मंदिर होते. मात्र ते नष्ट करून मशीद बांधली गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. हे ऐकून संतापलेल्या राजांनी मशीद पाडून आपल्या लोकांना पुन्हा मंदिर बांधण्याचे आदेश दिले. आजही तिथे सोमात्तीपेरुमल आणि शोणाचलपती असे एक शंकराचे, तर दुसरे विष्णूचे मंदिर बघायला मिळते. इतकेच नव्हे, तर महाराजांनी तिथे दीपोत्सवही सुरू केला. आजही तो रिवाज तिथे पाहायला मिळतो.महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जवळपास दोन वर्षे स्वराज्याबाहेर गेले होते.

पण त्या संपूर्ण परिसरावर शिवाजी महाराजांच्या येण्याचा आणि जाण्याचा परिणाम कोणत्या स्वरूपात होता याचा अभ्यास करता पुरावे मिळतात की राजे येऊन गेल्यानंतर अनेक वर्षे या भागातील बंद पडलेले वा पाडलेले जत्रा, यात्रा, सण, उत्सव नव्या उत्साहात पुन्हा सुरू झाले. मधली अनेक वर्षे सर्वत्र इस्लामी बादशहा असल्यामुळे आपले सण-उत्सव साजरे करून आक्रमणकर्त्यांच्या नजरेत येण्याची प्रजेची इच्छा नव्हती. मात्र एक हिंदू राजा, छत्रपती झाल्यामुळे उत्साहाची लाट निर्माण झाली होती. त्यामुळेच या राजाच्या प्रवासाचा परिणाम बंद पडलेले सण-उत्सव उत्साहाने सुरू होण्यामध्ये झाला. थोडक्यात, शिवाजी राजांचे हिंदुत्वाचे जागरण करण्याचे ध्येय अशा अनेक घटनांमधून दिसून येते.

आणखीही अनेक ठिकाणी राजांनी संस्कृतीचे रक्षण केल्याची उदाहरणे आढळतात. त्यातील एक म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा मधल्या २०० वर्षांमध्ये हिंदू राजाच झाला नसल्यामुळे राज्याभिषेक कसा करायचा याचे मंत्र आणि पोथी अस्तित्वात नव्हती. त्यामुळे गागाभट्टांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर एक पर्याय राज्याभिषेकच रद्द करणे हा होता किंवा मग मुस्लीम शासक सिंहासनावर बसताना म्हणत असतील त्या त्यांच्या धर्मातील मंत्रांचा आधार घेणे हा पर्याय होता. मात्र राजांनी हे दोन्ही पर्याय नाकारले आणि गागाभट्टांना नवीन पोथी निर्माण करण्याचे सूचित केले. आपल्याला हिंदू वैदिक पद्धतीनेच राज्याभिषिक्त व्हायचे आहे, असा त्यांचा आग्रह होता.
त्यानुसार गागाभट्ट पैठणला जाऊन काही महिने राहिले आणि वेद, उपनिषदे, पुराण यांचा आधार घेत त्यातील उत्तम श्लोक निवडत एक पोथी निर्माण केली. ‘राज्याभिषेक प्रयोग’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. आजही ती बाजारात उपलब्ध आहे. यातून राजांच्या मनी असणारी स्वधर्माच्या परंपरेप्रतीच्या प्रेमाची, आस्थेची पावती मिळते.

मराठी भाषेवर यावनी भाषेचे आक्रमण झाले असल्याचेही ते जाणून होते. या परभाषेच्या प्रभावाने मराठीत फारसी वा अरबी शब्द बेमालुम मिसळले गेले होते. मराठी भाषा अशुद्ध झाली होती. ती शुद्ध करण्यासाठी राजांनी रघुनाथ पंडित या आपल्या मंत्र्यांना बोलावून घेतले आणि शब्दकोश तयार करण्याची आज्ञा दिली. या शब्दकोशामध्ये त्यांनी अरबी, फारसी शब्दांना संस्कृतप्रचुर मराठीतील प्रतिशब्द देण्यास सांगितले. आज्ञेप्रमाणे रघुनाथ पंडित यांनी काम केले आणि ‘राज्य व्यवहारकोश’ या ग्रंथाची निर्मिती झाली.

सर्वदूर मुस्लीम बादशहाच असल्यामुळे त्या काळी हिजरी कालगणना प्रचलित होती. पत्रव्यवहार वा दस्तावेजांमध्ये याच कालगणनेचा वापर केला जायचा. साहजिकच आपली कालगणना मागे पडली होती. मात्र महाराजांनी राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन राज्याभिषेक शकाला सुरुवात केली. त्यामुळेच महाराज शककर्ते झाले आणि युगप्रवर्तक असणारा हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. यावरूनही आमच्या देशात आमची कालगणना, आमच्या परंपरेने सांगितलेली कालगणना असायला हवी हा राजांचा आग्रह दिसून येतो. म्हणूनच त्यानंतरच्या पत्रव्यवहारांवर ही कालगणना आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नव्हे, तर शिवाजी महाराजांचे पत्रांचे मायने बदलले. म्हणूनच नंतरच्या काळातील ‘अखंड लक्ष्मी अलंकृत करून…’ अशा स्वरूपाची भाषा असणारे संस्कृतप्रचुर तसेच आपल्या लोकांना समजायला सोपे मायने पाहायला मिळतात. इतके सगळे होत असताना राजांनी स्वत:ची नाणी पाडली. त्यावर एका बाजूला ‘श्री राजा शिव’ हे शब्द होते, तर दुसऱ्या बाजूला ‘छत्रपती’ असे शब्द होते. सोन्याच्या नाण्याला होन, तर तांब्याच्या नाण्याला शिवराई अशी नावे देत त्यांनी हे चलन प्रचलित केले. नाणी राजाच्या सार्वभौमत्वाचे लक्षण असतात. हे जाणूनच राजांनी ते निर्माण केले.

शिवरायांच्या मुद्रा आपण जाणतो. इथे लक्षात घ्यायला हवे की, राजांच्या माता-पित्यांच्या मुद्रा फारसीमध्ये होत्या. कारभारी दादोजी कोंडदेव यांची मुद्राही फारसीमध्ये होती. पण वयाच्या सोळाव्या वर्षी राजांनी आपली मुद्रा संस्कृतमध्ये करून घेतली. म्हणजेच इतक्या लहान वयापासून त्यांच्या मनातील स्वभाषेचा अभिमान आणि सार्वभौमत्वाचे लक्षण दिसून येते. राज्याभिषेकानंतर त्यांनी तीच मुद्रा प्रचलित ठेवली होती. धर्माचा त्याग करून परधर्म स्वीकारणाऱ्यांना पुन्हा धर्मात घेण्याची सोय करण्यासाठीही त्यांनी धर्मपंडितांना एकत्र केले आणि ‘घरवापसी’च्या दृष्टीने काळाच्या पुढे बघत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. म्हणजेच स्वराज्य म्हणजे केवळ तलवारी-भाले घेऊन जमीन जिंकणे नसते, तर स्वधर्म, स्वपरंपरा, स्वकालगणना, स्वभाषा यांची जपणूक करून स्वराज्य मिळते हे राजांनी दाखवून दिले. ही दृष्टी असल्यामुळेच त्यांचे राज्य बळकट झाले आणि दीर्घकाळ चालले. (शब्दांकन : स्वाती पेशवे)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -