कथा: रमेश तांबे
मध्यरात्री दोनचा ठोका वाजला आणि हातात काठी घेऊन शंकर घराबाहेर पडला. मिट्ट काळोखात चालू लागला. घरासमोरून जाणारी गाडीवाट आता काळीभोर दिसत होती. नाही म्हणायला चांदण्याच्या मंद प्रकाशात अंधुकसा पांढरा पट्टा तेवढा रस्त्याच्या कडेने दिसत होता. शंकरने रस्त्याचा आदमास घेतला आणि हातातली काठी सावरत तो रानाकडची वाट चालू लागला. चालता चालता आजूबाजूला त्याची नजर सारखी भिरभिरत होती. एखादे जनावर येईल आणि आपल्याला त्याचा वेध घेता येईल यासाठी तो डोळे फाडून बघत होता.
थोडा वेळ चालल्यानंतर त्याने खिशातून एक भलामोठा सुरा बाहेर काढला आणि हातातल्या काठीच्या एका टोकाला अडकवला. तो लावण्यासाठी विशिष्ट प्रकारची व्यवस्था काठीला केलेलीच होती. मघापासून हातात काठी असलेला शंकर आता भालेवाला बनला होता. तो झपझप चालू लागला. गावाची वेस ओलांडून तो आता रानात शिरला. हवेतला गारवा अधिकच वाढला. झाडाझुडपांची गर्दी वाढू लागली. आकाशातून मधूनच एखादा चुकार तारा पडताना दिसत होता. रानात मात्र दूरपर्यंत काळोखाशिवाय काहीच दिसत नव्हतं. आता गाडी रस्ता संपून गेला होता. शंकर बरेच अंतर चालून आला होता. शिकारीसाठी ही जागा बरी आहे असं त्याला वाटलं. मग तो एका भल्यामोठ्या झाडावर चढून बसला. अंधारात काही हालचाल होते का याचा अंदाज घेऊ लागला. रानात निरव शांतता होती. अधून मधून होणारी पानांची सळसळ शांततेचा भंग करत होती इतकेच.
पंधरा-वीस मिनिटांचा काळ गेला असेल. शंकर डोळे फाडून बघत होता. कानात प्राण आणून आवाजाचा अंदाज घेत होता. तेवढ्यात जमिनीवर पडलेल्या सुक्या पानावरून कोणीतरी येत असल्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज रानाची शांतता भंग करीत होता. शंकर सावध झाला. त्याने आवाजाचा वेध घेतला आणि सर्व शक्तीनिशी आवाजाच्या दिशेने त्या काळाकुट्ट अंधारात हातातला भाला फेकला. भाल्याने त्याचं काम नेमकं केलं. त्या जनावराच्या वर्मी घाव लागला असावा. कारण ते जनावर अस्पष्ट असं ओरडून जागीच धाडदिशी कोसळलं होतं. शंकरला खूप आनंद झाला. आज शिकार लगेच मिळाली म्हणून तो खूश झाला होता. लगबगीने तो झाडावरून खाली उतरला. अंदाजाने शिकार शोधून खांद्यावर टाकली आणि घराकडे निघाला झपझप झपझप! सावज बरंच मोठं दिसत होतं. रंगाने ते काळं असावं, कारण चांंदण्यांच्या प्रकाशातदेखील आपण शिकार नेमकी कुणाची केलीय हे त्याला कळत नव्हतं.
शंकर घराकडे परतला. गोठ्याच्या मागे शिकार टाकली. हात-पाय धुतले. काठीचं पातं काढून पुन्हा नेहमीच्या जागेवर लपवून ठेवलं. गोठ्यातली जनावरे अजून निजलेलीच होती. काळोखाचं साम्राज्य तसूभरदेखील कमी झालं नव्हतं. कडी उघडून शंकर घरात शिरला आणि समाधान झोपी गेला. अगदी शांत…!
घरात पोरांची रडारड सुरू झाली. तशी शंकरला जाग आली. डोक्यावरचं पांघरून न काढताच तो बायकोवर खेकसला. “अगं ए शेवंते वाईस झोपू दे की.” तशी शेवंती रागात म्हणाली, “हा, तुम्ही झोपा कुंभकर्णासारखं आठ-आठ वाजेपर्यंत. दिवस चांगला कासराभर वर आलाय. तिकडे आपलं कुत्रं मरून पडलंय, त्याचं काय बी नाय कुणाला! बिचारी पोरं आपल्या शेऱ्याला कुणी मारलं म्हणून रडत्यात.” तसा शंकर किंचाळला, “काय शेऱ्या मेला? पण कोणी मारला?” “मला काय माहीत. बघा जाऊन तिकडं गोठ्याच्या मागं पडलाय बिचारा. पोटच फाडलंय बघा कोणी!” शेवंती म्हणाली. तसा शंकर धावत सुटला.
गोठ्याच्या मागे जाऊन बघतो तर काय त्याचा, साऱ्या घराचा आवडता शेऱ्या पोटात भाला लागून मरून पडला होता. चांगला चार-पाच फूट लांबीचा, तगडा, काळाभोर कुत्रा. शेऱ्या म्हणजे साऱ्या घराचा ताईत! शंकर मनातून हळहळला. डोळ्यांत जमा झालेले अश्रू त्यांनी हळूच पुुसले. पण तो जास्त काही बोलू शकत नव्हता. कारण मालकाच्या रक्षणासाठी त्याच्या मागोमाग आलेल्या इमानदार शेऱ्याला शंकरनेच मारलं होतं! अगदी नकळत का होईना. शंकरचं बारकं पोरगं रडता रडता बापाला विचारत होतं, “बा सांग ना रं, कोणी मारलं माझ्या शेऱ्याला?” त्या निरागस प्रश्नाला उत्तर देण्याचं बळ शंकरपाशी नव्हतं. त्यानं पोराला उराशी कवटाळलं आणि तो रडत रडत म्हणाला, “उगा उगा, रडू नकोस पोरा रडू नकोस…”