आभाळाची आम्ही लेकरे
एका तुफानाच्या वेळी
रात्र पेंगुळली होती
जीर्ण-रंगीत गोधडी
खाली अंथरूण माती…
सटवाईच्या कुशीत
काट्या कुट्यातल जीणं
दैव-फासाची कुऱ्हाड
श्रम-कष्टाचं जगणं…
जीव आनंदून जाई
आग-पोटाची शमते
दोन-हात-दोन-पाय
उभ आयुष्य नाचते
बाप कोण पुसू नका
मायने जगविला गोळा
पायवाट ठिगळांची
भविष्याचा चोळा-मोळा…
स्वप्नं-गाठता उशाला
दिमतीला शीत-वारे
स्वैर छताखाली निजे
स्वप्रकाश देती तारे…
मुक्त-विहार-मनाचा
वाढे संचिताचे सार
निळ्या-सावलीत नांदे
खुल्या-आभाळी लेकर…
– पूजा अभय काळे, बोरिवली
खारूताई
खारूताई खारूताई
कुठे चाललीस घाई घाई
कामाशिवाय तुला
सुचत नाही का काही?
पाठीवर तुझ्या
किती गं पट्टेच पट्टे
एका जागी राहात नाही
म्हणून दिले का आईने रट्टे
चाहूल कुणाची लागता
लांब जाते पळून
पुन्हा पुन्हा पाहातेस
मागे मान वळून
दोन पायावर उभी राहून
दाखवितेस भारी तोरा
शोभून दिसतो तुला
रंग भुरा-भुरा
पळतांना हलवितेस
शेपूट झुपकेदार
पाहून तुझा भित्रेपणा
हसू येते फार
खारूताई – खारूताई
कर ना माझ्याशी दोस्ती
आपण दोघं मिळून
खूप करू मस्ती
– रवींद्र व्ही. चालीकवार, ता. महागाव, जि. यवतमाळ