Tuesday, July 16, 2024
HomeदेशPM Narendra Modi : भाजप सत्तेसाठी तिसरा कार्यकाळ मागत नाही, तर...

PM Narendra Modi : भाजप सत्तेसाठी तिसरा कार्यकाळ मागत नाही, तर…

भाजप अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी केलं महत्त्वपूर्ण वक्तव्य

काँग्रेस अस्थिरता आणि घराणेशाहीचं प्रतीक; मोदींची टीका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, भाजपचा कार्यकाळ देशसेवेसाठी काही ना काही करतच असतो. देश आता प्रगती करत आहे. सत्तेसाठी तिसरा कार्यकाळ मागत नाही, तर आणखी काही निर्णय घेण्यासाठी सत्ता मागत आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी येणाऱ्या काळातील आणखी काही मोठ्या निर्णयांचे संकेत दिले आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मागच्या दहा वर्षांत देशाने गतीने प्रगती केली आहे. हे एकटा मी म्हणत नाही तर सगळं जग गाजावाजा करुन ही बाब सांगते आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. एक मोठा संकल्प आणि प्रत्येक भारतीय जोडला गेला आहे. त्यामुळे आपला देश छोटी स्वप्नं पाहू शकत नाही आणि संकल्पही छोटे करु शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. आपल्याला भारत विकसित देश करायचा आहे हे आपलं स्वप्न आहे. यासाठी पुढच्या पाच वर्षांची खूप मोठी भूमिका असणार आहे. पुढच्या पाच वर्षांत आपल्याला विकसित भारतासाठी एक प्रचंड हनुमान उडी घ्यायची आहे. आपल्याला जर अशी हनुमान उडी घ्यायची असेल तर सरकारमध्ये भाजपा परत येणं आवश्यक आहे हे विसरु नका, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भाजपाला ३७० जागा जिंकाव्याच लागतील

आज विरोधी पक्षातले नेतेही एनडीए सरकार चारशे पार चे नारे देत आहेत. हे लक्ष्य गाठायचं असेल तर भाजपाला ३७० जागा जिंकाव्याच लागतील. अनेकदा लोक मला सांगतात तुम्ही इतकं सगळं केलंत आता कशाला धावपळ करता? त्यावर मी सांगतो दहा वर्षात निष्कलंक कार्यकाळ आपण दिला आहे. २५ कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढलं आहे. आपण आपल्या देशाला महाघोटाळ्यांमधून आणि दहशतवादी हल्ल्यांमधून मुक्ती दिली आहे. आपण गरीब आणि मध्यमवर्गीयांचं आयुष्य यांचा स्तर उंचावून दाखवला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन मी सांगतो…

एकदा एक बडे नेते मला भेटले. मला म्हणाले तुम्ही पंतप्रधान झालात ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही मुख्यमंत्रीही बराच काळ होतात, दुसऱ्यांदा पंतप्रधान झाला. आता तर थोडा आराम करा. असं मला एक बडे नेते म्हणाले होते. त्यांची ती भावना राजकीय अनुभवांतून आली होती. पण आपण राजकारण करत नाही आपण राष्ट्राची सेवा करतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. छत्रपती शिवराय हे छत्रपती झाले म्हणून त्यांनी आराम केला नाही. त्यांचं त्यांचं राज्य वाढवलं. त्यांचीच प्रेरणा घेऊन मी देखील हेच सांगतो आहे की मी देखील शांत बसणार नाही. राष्ट्राला विकसित राष्ट्र करायचं आहे हा माझा संकल्प आहे. जर मी माझ्या घराची काळजी करत बसलो असतो तर कोट्यवधी लोकांसाठी घरं बांधता आली नसती असंही मोदी यांनी म्हटलं.

आपण जुनाट व्यवस्था मूळापासून बदलल्या

आधी लोकांना वाटायचं सरकार बदलतं, व्यवस्था बदलत नाही. मात्र आपण जुन्या विचारसरणीतल्या व्यवस्था बाहेर काढल्या. ज्यांना कुणी विचारत नव्हतं त्यांची आपण पूजा केली आहे हे कुणी विसरु नका. आदिवासी समाजातल्या सर्वात मागास समाजाला कुणी विचारतही नव्हतं त्यांच्यासाठी आपण योजना तयार केली. फूटपाथ, गाड्यांवर काम करणाऱ्या लोकांचा विचार कुणी केला नव्हता त्यांच्यासाठी आपण पीएम स्वनिधी योजना तयार केली. आपल्याकडे मुलींना गर्भात मारुन टाकलं जाण्याची कुप्रथा होती. त्याविरोधात समाजजागृती आणि कायद्याचा आधार घेतला. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम आपण मोठ्या प्रमाणावर चालवली हे विसरता येणार नाही असंही मोदी यांनी भाषणात म्हटलं.

काँग्रेस अस्थिरता आणि घराणेशाहीचं प्रतीक

काँग्रेस आपल्या लष्कराचे मनोबल कमी करण्याचं काम करत आहे. काँग्रेस अस्थिरता आणि घराणेशाहीचं प्रतीक आहे. काँग्रेस गोंधळलेली आहे. मोदीवर टीका करणे हा एकच त्यांचा अजेंडा आहे. भारत सशक्त झाल्यास जगाचं हित होईल हे सर्वच जण मानतात. पाच अरब देशांनी मला सर्वोच्च सन्मान दिला. काँग्रेसकडे विकासाचा रोडमॅप नाही. त्यांच्याकडे वैचारिक लढाईचं सामर्थ्य नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -