Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीपेणमध्ये फार्म हाऊसवर एमडी ड्रग्जची निर्मिती

पेणमध्ये फार्म हाऊसवर एमडी ड्रग्जची निर्मिती

आठ जणांची टोळी गजाआड, ५५ लाखांच्या ड्रग्जसह मुद्देमाल जप्त

पेण(देवा पेरवी)– रायगड जिल्ह्यातील पेण येथील कलद गावातील एका फार्महाऊस मध्ये एमडी ड्रग्ज बनवून त्याची विक्री करणाऱ्या मुख्य सुत्रधारासह एकूण आठ जणांच्या ड्रग्ज माफिया टोळीस ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मनोज उर्फ बाळा लक्ष्मण पाटीलअसे अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. या सुत्रधारासह त्याच्या सात ड्रग्ज तस्कर साथीदारांना देखील ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून एमडीसह ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा एकूण ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने २८ डिसेंबर २०२३ रोजी जयेश प्रदीप कांबळी उर्फ गोलू आणि विघ्नेश विनायक शिर्के उर्फ विघण्या या दोन एमडी ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 78.8 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले होते. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या दोघांनी एमडी ड्रग्ज कोठून आणले याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत असतांना त्यांनी हे एमडी ड्रग्ज अहमद मोहम्मद शफी उर्फ अकबर खाऊ (वय ४१, कुर्ला, मुंबई), शबीर अब्दुल करीम शेख ( वय ४४, कुर्ला, मुंबई), आणि मोहमद रईस हनिफ अन्सारी(वय ४७, कुर्ला, मुंबई) यांच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अकबर खाऊ, शबीर शेख यांना ५ जानेवारी २०२४ला पालघर जिल्ह्यातील चिंचोटी येथे २६ ग्रॅम एमडी आणि ४ किलो ८५० ग्रॅम चरससह अटक केली. तर मोहमद रईस हनिफ अन्सारी यास १८ जानेवारी २०२४ ला विरार मधून अटक केली. अटक केलेल्या तस्करांची चौकशी केली असता या तस्करांना अमीर खान नामक ड्रग्ज पेडलर्स एमडीचा पुरवठा करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने २९ जानेवारी २०२४ला मुंबईतून मोहम्मद अमीर अमनतुल्ला खान (वय ४४, कुर्ला) यास अटक केली.

सदर ड्रग्ज मनोज पाटील नामक व्यक्ती कडून घेतले असून तो पेण येथील एका फार्म हाऊस मध्ये एमडी निर्मिती करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी अधिक तपास केला असता मनोज पाटील उर्फ बाळा नामक व्यक्तीस ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी याअगोदर ही अटक केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तो गुजरात राज्यातील लाजपोर जेल मधून पेरॉलवर मार्च २०२३ मध्ये बाहेर आला होता, मात्र त्यानंतर परत जेलमध्ये हजर न होता फरार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांनी मुख्य सुत्रधाराचा कसून शोध सुरू केला असता अखेर ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मनोज पाटील उर्फ बाळा (वय ४४, रा.पेण, जिल्हा-रायगड) यास रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून अटक करण्यात आली. तसेच त्याचा साथीदार दिनेश देवजी म्हात्रे (वय 38, पेण, रायगड) यास देखील पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी अटक केली. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स ची निर्मिती होत असताना स्थानिक पोलीस स्टेशनला याची भनक ही लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गांजा व इतर अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असते.

यापूर्वी देखील ड्रग्ज फॅक्टरीचा कट उघड 

ठाणे पोलिसांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारे एका ड्रग्ज तस्कर टोळीला अटक करून कोकणात उभारल्या जाणाऱ्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश मागील वर्षी केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एमडी ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लॅन अभिषेक कुंतल नामक तस्कराने आखला होता. कुंतल याने त्याचा साथीदार संतोष सिंग याच्या सोबत मिळून ऑक्टोबर २०२२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लॅन आखला होता असे त्यावेळी उघड झाले होते.

फार्म हाऊस मध्ये केमिकल वापरून एमडी ड्रग्ज निर्मिती 

अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून असे समोर आले की, मनोज पाटील उर्फ बाळा याने आपला साथीदार दिनेश म्हात्रे व अमीर खान यांच्या सोबत मिळून पेण तालुक्यातील कलद गाव येथील एक फार्म हाऊस भाड्याने घेतले होते. या फार्म हाऊस मध्ये विविध प्रकारचे केमिकल वापरून एमडी ड्रग्ज निर्मिती केली जात होती. जून २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज निर्मिती या तस्करांनी केली. त्यानंतर जागा मालकाला संशय आल्याने ही ड्रग्ज निर्मिती काही काळ बंद करण्यात आली होती. मात्र, अटक असलेला आरोपी मनोज पाटील हा आपल्या साथीदारांसह पुन्हा ड्रग्ज निर्मितीची तयारी करीत होता असे देखील पोलीस तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात आठही आरोपींच्या ताब्यातून एकूण ५५ लाख ७३ हजाराचे ड्रग्ज व अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे केमिकल व साहित्य जप्त केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -