Friday, April 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजचला फिरूया, अनुभवसमृद्ध होऊया...

चला फिरूया, अनुभवसमृद्ध होऊया…

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

‘केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।।’

हे कवी मोरोपंत यांचे शब्द आहेत. यातील देशाटन याचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे. आजच्या भाषेत देशाटन म्हणजेच पर्यटन, टुरिझम. आज टुरिझम किंवा पर्यटनाला खूप मोठा अर्थ प्राप्त झाला आहे. हा शब्द व्यावसायिकीकरणाशी जोडला गेला आहे. पर्यटनातून, टुरिझममधून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गणित एखादा देश बांधू लागला आहे. त्याच्या बजेटमध्ये सुद्धा टुरिझम हा आता खूप मोठा भाग बनू लागला आहे.

ब्रह्माण्डामध्ये पृथ्वीच हा अतियश सुंदर ग्रह असल्याचं म्हटलं जातं. या पृथ्वीवर मनुष्य कोट्यवधी वर्षांपासून राहत आहे. तो जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासूनच देशाटन किंवा पर्यटन हे शब्द त्या त्या वेळेला तात्कालीक अर्थाने जोडले गेलेले दिसून आले. स्वअस्तित्वासाठी मनुष्य एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरू लागला. स्वतःसाठी निवाराकडून शोधू लागला. उंच उंच डोंगर चढून ते उतरू लागला, नद्या, ओढे, समुद्र ओलांडू लागला. आपल्यासारखंच कुणीतरी आहे का पलीकडे? याचा शोध घेण्यासाठी तो देशाटन करू लागला. अर्थात त्यावेळेला देश ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. त्यावेळेला टोळ्या करून राहणारे मनुष्य एकत्र होते.

हळूहळू मनुष्याने स्वतःमध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये बदल केला. त्याचं राहणीमान बदललं. त्यानुसार त्याचा परिसर बदलत गेला, मनुष्याने स्वतःच्या बुद्धीने या पृथ्वीला नवं रूप दिलं. हळूहळू पृथ्वीवर देश तयार केले, सीमारेषा तयार झाल्या. या सीमारेषा तयार होताना, देश ही संकल्पना रूढ होताना, जल आणि भूमी या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर त्या अवलंबल्या. गेल्या त्यानंतर काही निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशी स्थळे, असा परिसर असा भूभाग तयार झाला. मनुष्य हळूहळू स्थिर झाला.

एका ठिकाणी राहू लागला. मात्र तरीही त्याच्या पायाला लागलेलं फिरणं काही थांबलं नाही. त्यानंतर पोट भरण्यासाठी तो फिरत राहिला, शोध घेत राहिला, नोकरी-व्यवसाय करण्यासाठी त्याने त्याने फिरणे सुरू ठेवले. त्या काळाला या पर्यटनाची कोलंबस असू दे किंवा वास्को-दी-गामा असू दे. त्यांनी सुद्धा देशाटन केलं. त्यावेळेला ते नवीन भूमी शोधत होते. हळूहळू मनुष्याच्या आवाक्यात ही पृथ्वी आली. मनुष्य स्वतःचा विकास करत राहिला. त्यानंतर फॉरेन किंवा परदेश हे शब्द रूढ झाले. मात्र आता या काळात पर्यटन या संकल्पनेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झाला आहे. मनुष्य आपापल्या ठिकाणी स्थिर झाला. त्याचे आयुष्य अनेक भौतिक सुखांनी सुखी झालं. आता त्याला त्याचा वेळ घालवणं, त्याच्या कामाच्या ताणातून मोकळीक मिळण्यासाठी त्याने मन-रंजनाचे अर्थात मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली. त्यातीलच वाचन आणि पर्यटन किंवा फिरणं हे दोन महत्त्वाचे पर्याय त्याला समोर दिसले.

पर्यटनामध्ये वेगळ्या ठिकाणी जाऊन नवं काहीतरी पाहणं-शोधणं, त्यातून आनंद घेणं, आपल्यापेक्षा वेगळे काहीतरी असेल, तर ते आत्मसात करून आपण जिथे राहतो तिथे ते रुजवू शकतो का या दृष्टीने त्याचा अभ्यास करणे असं अशी एक संकल्पना हळूहळू रुजू लागली. मनुष्य काही वर्षांपूर्वी एका ठरावीक कालावधीसाठी बाहेर पडत असे. त्यामध्ये तो त्यांच्या पै-पाहुण्यांना भेटत असे, मित्र-मैत्रिणींना भेटत असे. त्या वेळेलाही टुरिझम किंवा पर्यटन ही संकल्पना हळूहळू विकसित व्हायला लागली होती. मात्र गेल्या दहा ते वीस वर्षांमध्ये पर्यटन किंवा टुरिझम हा एक व्यवसाय बनू लागला आहे.

आपल्यापासून खूप लांब असलेली डेस्टिनेशन्स किंवा पर्यटन स्थळांचा प्रचार करायचा आणि पर्यटन सहलींचा आयोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना न्यायचं आणि त्यांना अनुभव समृद्ध करायचं आणि त्यातून अर्थार्जन करायचं अशी एक संकल्पना या टुरिझम किंवा पर्यटनाच्या माध्यमातून रुजू लागली आहे आणि आता ती दृढ झाली आहे. पर्यटन व्यवसाय हा भारतामध्ये खूप मोठा व्यवसाय समजला जाऊ लागलाय. भारतात प्रत्येक राज्यात, प्रत्येक भागामध्ये त्याचं त्याचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाची भाषा, राहणीमान, संस्कृती वेगळी आहे. भारतात विविधतेतून एकता आहे. हे पाहण्यासाठी परदेशातून लोक भारतात येतात. त्यामुळे इथल्या सोयीसुविधांचा ते उपयोग करतात. त्यामध्ये निवास न्याहरी याचा मोठा सहभाग असतो, स्थानिकांना त्यातूनच अर्थार्जन होतं. या पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून आज कोट्यवधींची उलाढाल भारतामध्ये केले जाते.

त्याच वेळेला भारतीय सुद्धा अनेक देशांमध्ये पर्यटनासाठी जात असतात. भारतीय लोकांमुळे सुद्धा अनेक देशाच्या आर्थिक व्यवहारात पर्यटनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल होते हे आपण काही दिवसांपूर्वीच पाहिला आहे. भारतीयांनी मालदीव या देशात जाणं बंद केल्यावर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झालेला आणि फटका बसलेला सुद्धा आपण पाहिला आहे. देशात भारतातील महाराष्ट्रातील आणि कोकणातील पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी त्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर भारतातील पर्यटन व्यवसाय बूस्ट व्हावा यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे.

लक्षद्वीपमधील मोदींचे काही काळाचे वास्तव्य लक्षद्वीपच्या पर्यटन व्यवसायाला चालना देणारे ठरले आहे. त्यामुळे हा भाग आता सर्व जगाच्या समोर आला आहे. आज पर्यटन केलंच पाहिजे कारण आपण अनुभव समृद्ध होत असतो. खरं तर मोबाइलमुळे एका क्लिकवर सगळं जग आपल्या हातात आलं आहे. कुठलेही फोटो, कुठलाही व्हीडिओ अवघ्या काही सेकंदात आपल्यासमोर येतो. त्यामुळे कदाचित अमेरिका म्हणजे काय लंडन म्हणजे काय आणि भारतातला कुठला एखादा भूभाग असो तो काहीं सेकंदात आपल्या हातातल्या छोट्याशा मोबाइलवरही पाहू शकतो; परंतु एखाद्या ठिकाणी जाऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि त्या अनुभवातून काहीतरी नव शिकत जाणं म्हणजेच खरं पर्यटन आहे.

भारतात यापूर्वी दोनच पर्यटन सिझन होते. मात्र आता बाराही महिने पर्यटन व्यवसाय विकसित होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळी पर्यटन, कृषी पर्यटन, धार्मिक पर्यटन अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींवरून पर्यटन व्यवसाय आता वृद्धिंगत होतो आहे. विकसित होतो आहे. अर्थात गरज आपण सगळीकडे डोळसपणे पाहण्याची आणि ठिकाणी जाऊन तिकडचं सौंदर्य टिपण्याची त्यातून नवं काही शिकण्याची आहे इतकीच.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -