प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
“एक वाचक मरण्यापूर्वी हजारो आयुष्य जगतो, जो माणूस कधीही वाचत नाही तो फक्त एकच माणूस म्हणून जगतो.”
या वाक्याचा अनेकदा अनुभव मी अनेक वाचनप्रिय माणसांच्या अनुभवातून घेतलेला आहे. ‘विद्या विनयेन शोभते’, त्याप्रमाणे विद्वान माणूस हा विनयशील होत जातो. त्याचे काही शब्द, विचार खूप काही सांगून जातात. त्यामुळे एका आयुष्यामध्ये हजारो आयुष्य जगण्यासाठी, ज्ञानी होण्यासाठी, विनयशील होण्यासाठी आपल्याला खूप पुस्तकं वाचण्याची आवश्यकता आहे. आयुष्यभर चोवीस तास जरी पुस्तकं वाचली तरी ती निश्चितपणे वाचून संपणार नाहीत. न संपणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यात पुस्तक आहेतच!
झपाट्याने आयुष्य बदलत चालले आहे. त्यामुळे पुस्तक निर्मिती, पुस्तकाचे वाचक, पुस्तकाचे वाचन करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. आजच्या तारखेला केलेले कोणतेही विधान हे सर्वस्वी बरोबर किंवा सर्वस्वी चूक नसते, त्याचप्रमाणे ते कायमस्वरूपी टिकून राहते, असेही नाही. तरी पुस्तकांच्या बाबतीत माझी मते मला इथे उद्धृत करावीशी वाटतात. साहित्य संमेलन आणि त्यानिमित्ताने होणारी पुस्तक विक्री हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. एखाद्या मांडवामध्ये सर्व नातेवाईक भेटावे त्याप्रमाणे या पुस्तक विक्री दालनात अनेक साहित्यिक आपल्याला भेटतात. त्यांच्या त्यांच्या पुस्तकाच्या स्टॉल्सवर आपण त्यांच्या सहीने पुस्तक विकत घेऊ शकतो. असे पुस्तक आपल्याकडे असणे खूप आनंददायी असते; परंतु आजकाल काही कारणास्तव या पुस्तक विक्री दालनामधली गर्दी घटू लागली आहे. कधी एखाद्या मैदानात हे स्टॉल उभारल्यावर मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या-येणाऱ्या माणसांमुळे धुळीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे लोक फिरकत नाहीत.
कधी एखाद्या भागात उन्हाचा त्रास झाल्यामुळे लोक फिरकत नाहीत, तर कधी हे स्टॉल्स मुख्य मंडपापासून दूरवर असतात, त्यामुळे तिथे लोक फिरकत नाहीत. कारणं वेगळी-वेगळी आहेत. ते स्टॉल्स कुठे कसे उभारले गेले पाहिजेत, यासाठी साहित्य संमेलनात प्रकाशकांच्या बाजूनेही थोडासा विचार केला गेला पाहिजे, असे मला वाटते. खूप उदाहरणे देता येतील; परंतु एकच उदाहरण देते – यंदा अमळनेर येथे झालेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, मुख्य मांडवापासून पुस्तक विक्री स्टॉल्स हे दूर होते. ज्या वयाची माणसे संमेलनात येतात, त्यांच्यासाठी हे त्रासदायक होते तसेच शालेय विद्यार्थी किंवा साहित्यिक जे कार्यक्रमासाठी आलेले होते त्यांच्या कटाक्षात नसल्यामुळे त्यांच्याकडूनही दुर्लक्षिले गेले.
दहा ते पंधरा साहित्य संमेलनांना हजेरी लावल्यामुळे मला असे वाटते, कोणतेही जेवणाचे व्हीव्हीआयपी कक्ष असोत किंवा सामान्य लोकांसाठीचे असोत हे पुस्तक स्टॉल्स पार केल्यावरच ठेवावेत. जेणेकरून पुस्तकांच्या स्टॉलकडे सगळ्यांचे लक्ष जाईल. दिसते ते विकले जाते, या उक्तीनुसार, पुस्तके विकली जातील. कमीत कमी मुख्य मंडपाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असावेत, ज्यामुळे तिथे येणारा प्रत्येक माणूस या पुस्तकांच्या स्टॉल्समधून एक तरी फेरी मारेल! इतकेच नव्हे तर पुस्तकांच्या स्टॉलवर असणारे पुस्तक विक्रेते हेसुद्धा खूपदा साहित्यिक असतात वा साहित्यप्रेमी असतात. त्यांनाही आपल्या स्टॉल्सवरून रिकाम्या वेळात कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल!
दुसरी महत्त्वाची गोष्ट मला येथे नमूद करायची आहे की, जेव्हा-केव्हा छोटी-मोठी साहित्य संमेलने भरवली जातात, तेव्हा त्या कार्यक्रमातल्या प्रत्येक सूत्रसंचालकाला कंपल्सरी हे सांगायला हवे की त्यांनी त्यांच्या संपूर्ण सूत्रसंचालनात कमीत कमी तीन ते चार वेळा पुस्तकांच्या स्टॉल्सविषयी माहिती द्यायला हवी की ते कुठे आहेत, कोणत्या स्वरूपाची पुस्तके तिथे आहेत वगैरे वगैरे. याचा निश्चितपणे फायदा होतो, याचाही अनुभव मी घेतला आहे. तिसरी अतिमहत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या वक्त्यांनी आणि तेथे येणाऱ्या प्रत्येकाने किमान एक तरी, कमीत कमी रकमेचे तरी पुस्तक विकत घेतले पाहिजे! ते पुस्तक त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाइकांना वा घरातल्या कामवाल्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट द्यायला हवे.
इथे मला माझे एक वैयक्तिक उदाहरण द्यायला आवडेल. माझ्या घरात कोणतेही पुस्तक आले की, ते टीपॉयवर पडलेले असते. माझी बाई दोन मिनिटं का होईना मांडी घालून जमिनीवर बसून ते पुस्तक वाचते हे मी पाहिले. तशी ती चौथी-पाचवीपर्यंत शिकलेली आहे. मग मी तिला कोणते विषय आवडतात, हे विचारून त्यानुसार पुस्तक भेट द्यायला सुरुवात केली. आज पंधरा वर्षे तिच्या मुला-बाळांच्या वाढदिवशीही मी तिला पुस्तकं देते. आठवडाभरात ती स्वतःच तिनेही त्यातले काय वाचले हे मला आपण सांगते. तिची मुले तर ती पुस्तके वाचतातच; परंतु तिच्या घरात आलेले इतर नातेवाईकही पुस्तक हाताळतात. तिच्या घरात आज वीस-पंचवीस पुस्तके आहेत, याविषयी ती नेहमीच माझ्याकडे आनंद व्यक्त करते.
आपण पुस्तकांसाठी काय करू शकतो, याचा विचार करून त्रास न करून घेता, आपल्या पातळीवर आपण स्वतः काय करू शकतो, एवढा विचारसुद्धा फार महत्त्वाचा आहे. शेवटी एक खूप संवेदनशील अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ‘व्यास क्रिएशन’च्या स्टॉलवर मी गेले असता तो स्टॉल सांभाळणाऱ्या राजेश देसाई यांना सहज विचारले की, “कितपत पुस्तक विक्री झाली?” तर ते म्हणाले की, “माणसं स्टॉल्सकडे फिरकली तर विक्री होईल ना… आम्हाला पुस्तकं विकली गेली नाहीत तरी काहीही वाटत नाही, फक्त माणसं येऊन पुस्तक हाताळतात, हे पाहूनही आम्हाला खूप आनंद होतो. पण या वर्षी दूर असलेल्या या पुस्तक स्टॉल्समुळे पुस्तके हाताळली गेली नाहीत, याचं वाईट वाटतंय…” असे म्हणत त्यांनी काही वर्षांपूर्वीच्या स्टॉल्सवरचे फोटो दाखवले, ज्यात खूप सारी मुले हातात पुस्तके घेऊन ती वाचण्यात रमलेली होती! चला तर मग आपणही शक्य असेल, तिथे पुस्तकं हाताळूया आणि काही माणसांपर्यंत ती हाताळण्यासाठी पोहोचवूया!
pratibha.saraph@ gmail.com