३ दिवसांच्या उपवासानंतर केला देहत्याग; जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर
रायपूर : जैन (Jain) धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज (Aacharya VidhyaSagar Maharaj) यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी छत्तीसगडच्या (Chattisgarh) डोंगरगड इथे त्यांचं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी, तसेच दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे जैन धर्मियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आचार्य विद्यासागर महाराज यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या प्राणाचा त्याग केला आणि ते ब्रह्मलीन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून डोंगरगढ येथील चंद्रगिरी येथे राहत होते आणि गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. आज त्यांना पंचतत्वात विलीन करण्यात येईल.
आचार्य विद्यासागर महाराज हे आचार्य ज्ञानसागर यांचे शिष्य होते. आचार्य ज्ञानसागर यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी आपले आचार्यपद मुनी विद्यासागर यांच्याकडे सोपवले होते. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी २२ नोव्हेंबर १९७२ रोजी मुनी विद्यासागर आचार्य बनले. त्याचप्रमाणे आचार्य विद्यासागर महाराज यांनीही तीन वर्षांपूर्वी आपल्या आचार्यपदाचा त्याग करून आपले आचार्यपद त्यांचे आद्य शिष्य ऋषी शिष्य निर्णयक श्रमण मुनी श्री समयसागर यांच्याकडे सोपवले.
कोण आहेत आचार्य विद्यासागर?
आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म १० ऑक्टोबर १९४६ रोजी कर्नाटकमध्ये झाला. त्यांना ३ भाऊ आणि २ बहिणी आहेत. त्यांच्या बहिणी स्वर्णा आणि सुवर्णा यांनीही त्यांच्याकडून ब्रह्मचर्य धारण केले. आचार्य विद्यासागर महाराज यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केलं. आत्तापर्यंत त्यांनी ५०० हून अधिक दीक्षा दिल्या आहेत. अलीकडेच ११ फेब्रुवारी रोजी, आचार्य विद्यासागर महाराज यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वाचा देव म्हणून गौरव करण्यात आला. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे त्यांच्यावर आज दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींनीही घेतलं होतं दर्शन
गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला छत्तीसगड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही डोंगरगड गाठून जैन साधू विद्यासागर महाराज यांचं दर्शन घेतलं होतं. आचार्य विद्यासागर महाराज हे लोककल्याणासाठी ओळखले जात. गरीबांपासून तुरुंगातील कैद्यांपर्यंत सर्वांसाठी त्यांनी काम केले. आचार्य विद्यासागर महाराज नेहमी देशासाठी ‘इंडिया नव्हे , भारत बोला’ असे म्हणत आणि हिंदी राष्ट्र आणि हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी ते नेहमीच आघाडीवर होते.