Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगृहिणी-सचिव

गृहिणी-सचिव

नक्षत्रांचे देणे: डॉ. विजया वाड

कटुता आली होती. दोन मित्र सख्खे. पण व्यवसायातील स्पर्धेनं आपोआप कटुता निर्माण झाली होती.
का?
अहो मिळकत! तफावत, दर्जा, नि संधी दोन आयुष्यं बदलून टाकतात. विमान कंपनीचं कंत्राट सख्याला मिळालं, नि लोएस्ट टेंडर पास झालं. सारं काही सख्याच्या मनमर्जीप्रमाणे कंपनीच्या बॉसनं केलं. पण हरी…
सख्खा मित्र, मायूस झाला. दिवसचे दिवस घरात बसून कंटाळला. बाहेर बिड्या फुकून विटला. नंतर पारोसा कोपऱ्यात बसला. नि बायकोवर खेकसून कंटाळला हक्काची तीच असते ना! राग-लोभ सारे सहन करते. नवऱ्याचे मूड्स जपते. टाकून बोललं तरी गप्प सहन करते. पण घर जपते. घराचे घरपण मुलांसाठी जपते. वेळेला नमतं घेते, पण शांतता विस्कटू देत नाही घराची.

“आपण नाही हं मैत्री तोडायची” सख्याची बायको रूपा म्हणाली.
“त्यांचं त्यांचं काही असो आपण रूपा-राधाच राहू. सख्ख्या मैत्रिणी.”
“बघ हं ठऱ्या म्हणजे ठऱ्या.”
“अगदी कऱ्या म्हणजे कऱ्या.”
“नक्की. आपण दोघी पऱ्या.”
“पंख लावून आकाशात पसऱ्या.”
दोघी जीवाच्या मैत्रिणी मनापासून हसल्या. र ला र, ट ला ट म्हणून खूश झाल्या.
मग तर सख्याची मिळकत वाढू लागली नि राधाची आर्थिकता… सुधारली. पैसा हो!
पैसा माणसाला बिघडवतो.

अगदी पटकन बिथरवतो. सख्याचंही तसंच झालं. हरीशी दोस्ती, कम होते गयी.
कितनी कम? न के बराबर! सख्यापाशी वेळच नव्हता ना! दोन दोन स्वतंत्र विमान कंपन्यांची कंत्राटे जी मिळाली होती! एखादे कंत्राट मित्रास दिले असते चालवायला! पण ना! ना ना नाही! पैसा हो!
सख्याची बायको रूपा नि हरीची बायको राधा मात्र मैत्रिणीच राहिल्या. दोघींचे एकत्र पदार्थ करणे, नव्या नव्या पदार्थांची चव चाखणे… सारे सुरूच होते. फक्त रूपाच्या गॅसवर पाककृती होत होती. राधा रूपाकडे येई पदार्थ बनवे. हक्कानं घरी नेई. हरीला खायला घाली.

“खीर मस्त झालीय रूपा.”
“चविष्ट झालीय ना?”
“त्यात वेलदोड्याचा वास फार मस्त येतो आहे.”
“आणि गोड झालीय का?”
“तुझ्यासारखी गोड झालीय.”
“थँक्यू नौरोजीराव!”

“शहाणी बायको गप्प बसली. खीर शेजघरात बनली होती. पण हे नौरोजींना कळले असते की रंगाचा बेरंग व्हायला वेळ नसता लागला.
“आम्ही दोघी सख्या
स्वभावाने सारख्या,
मैत्रीला पारख्या?
ना बाबा ना!
आम्ही दोघी जीवाच्या
आपल्या गृहाच्या…
मैत्री नाही सोडायच्या…
ना बाबा ना!”

खीर नौरोजींनी चाटून पुसून खाल्ली. बायकोला काही दिलं नाही. वाडगा संपला. मग बायको आठवली.
“अरे, तुला उरलीच नाही गं खीर!”
नौरोजी समाधान मनात, पण असमाधान आवाजात ओतत बोलले.
“न का उरेना! तुमचे पोट भरले ना? मग माझे भरल्यागतच आहे.”
“अगं अगं कसं?”
“तुम्ही आणि मी वेगळे का आहोत? बायको ही पतीची अर्धांगिनी असते की नाही? अहो तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान मी पिते.”

“किती कमाल आहे ना?” तो तृप्तीची ढेकर देत म्हणाला.
“जोडपं म्हणतात ना नवरा-बायकोला? त्यात ‘जोड’ नवऱ्याची ‘पं’ पंखाची साथ बायकोची. पंखातला ‘ख’ हळूळूच गिळायची.”
“व्वा! मस्त जम्या.” नौरोजी तृप्त होत म्हणाले. “आता इतक्या लवकर जेवण नको.” नौरोजी म्हणाले.
“बरं बरं.“ शहाण्या बायकोनं आज्ञापालन केले.
“ही खीर अगदी वहिनींसारखी झालीय.”
“तुम्हाला आवडली ना?”

“त्यांच्याकडून शिकलीस?” त्याने कुतूहलाने विचारले.
“त्यांच्याकडून नव्हे. त्यांचीच आहे. मला आग्रह केला. भावजीकरिता एक वाडगा केलाय. मी मुद्दाम त्यांच्या वाट्याची केलीय.”
“असं म्हणाल्या वहिनी?”“अहो भांडणं कापसाच्या कांडीगत जाळून टाका आता. आम्ही मैत्रिणी आहोत सख्ख्या. त्यात बिघाड नाही.”

मग नवऱ्याने प्रेमाने पाहत बायको म्हणाली,
“गृहिणी सचिव
मैत्री अतिव,
मनात नाते, जपून ठेव!
नाते जीवाचे, जणू शिवाचे
पवित्र ऐसे… जणू जन्मभराचे!” तिच्या मुखातून गीता…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -