
मुदत संपण्यापूर्वीच का घेतला हा निर्णय?
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत (Onion Farmers) मोठा निर्णय घेत अखेर कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली (Onion Export Ban Lift) आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सरकारने जरी कांदा निर्यातीला परवानगी दिली असली तरी त्यावर मर्यादा ठेवण्यात आली आहे. ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने परवानगी दिली आहे.
डिसेंबर महिन्यात कांद्याच्या किमती वेगाने वाढल्या होत्या. कांदा १०० रुपये किलो विकला जात होता. कांद्याचे कमी उत्पादन आणि भरमसाठ वाढलेल्या किंमतींमुळे केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात ८ तारखेला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत होती. परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा पाहता सरकारने ही कांद्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी देखील केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची शक्यता असल्याचे सांगतले जात होते. कांदा उत्पादक भागातील कांदा आणि इतर भाज्यांचे भाव कोसळणे हे त्याचे प्रमुख कारण होते. आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे.