Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘ढसाळ’ नावाचा झंझावात पडद्यावर!

‘ढसाळ’ नावाचा झंझावात पडद्यावर!

ऐकलंत का!: दीपक परब

पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पिडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पँथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचे जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पँथरने एक राजकीय व सामाजिक वादळ तयार केले होते. द बायोस्कोप फिल्म्सने बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबीयांकडून अधिकृतपणे घेतले असून सखोल संशोधन आणि अभ्यासांती हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यासाठी सज्ज होत आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करण्याचे हे आव्हान पेलले आहे संजय पांडे यांनी. ढसाळ यांच्या सर्व देश-विदेशातील चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे.

संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ढसाळ यांचे जीवन अशीच एक ज्वलंतकथा आहे. खेडेगावातील महारवाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामाठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळांनी जागतिक पातळीवर आपल्या कवितेचा ठसा उमटविला. त्यांनी उभारलेली कट्टर दलित पँथर चळवळ व बंडखोर कवितांमधून त्यांनी दलित आणि गरिबांच्या हक्कांसाठी अथक लढा दिला. जातीच्या फिल्टरशिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या अंतःकरणाला थेट भिडू शकतात कारण हे विचार कालातीत आहेत. ढसाळ हे व्यक्तीपेक्षा एक शक्तिशाली, प्रक्षोभक असा विचार होता आणि हा विचार आव्हानात्मक असल्याने तो तमाम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्याला प्राधान्य दिले असल्याचे लेखिका आणि दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी सांगितले.

नामदेव यांचा १५ फेब्रुवारी हा जन्मदिवस आणि ढसाळ नावाचा झंझावात शांत झाल्याला १० वर्षे झाली. नामदेवचा समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन व माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला ‘ढसाळ’ चित्रपटातून दिसतील. या चित्रपटात ढसाळ यांच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, राजकारण, पूर्ण दलित पँथरची दहशत असलेली चळवळ असा सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. हा बायोपिक एक महत्त्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’ आहे, अशी प्रतिक्रिया ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -