Thursday, June 19, 2025

Amit Shah : लांगुलचालन आणि घराणेशाही जपणार्‍या पक्षांचं नेतृत्व काँग्रेसकडे

Amit Shah : लांगुलचालन आणि घराणेशाही जपणार्‍या पक्षांचं नेतृत्व काँग्रेसकडे

भाजप अधिवेशनात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचं (BJP) आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तर पुन्हा एकदा चांगले निर्णय घेण्यासाठी भाजप सत्तेत येणं आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले. यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि मागच्या दहा वर्षातल्या त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील, असा विश्वास यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केला.


अमित शाह म्हणाले, मागच्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात समाजाच्या प्रत्येक वर्गाने विकास साधला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील यात काहीही शंका नाही. तसंच दहशतवाद, नक्षलवाद संपवण्यासाठी मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ पुरेसा आहे असाही विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.


पुढे ते म्हणाले, “मागच्या ७५ वर्षांच्या काळात लोकसभेच्या १७ निवडणुका, २२ सरकारं आणि १५ पंतप्रधान देशाने पाहिले आहेत. देशाचा विकास करण्याचा प्रयत्न त्या त्या सरकारांनी त्यांच्या परिने केला. मात्र आज कुठलाही संभ्रम मनात न ठेवता मी हे आत्मविश्वासाने सांगू इच्छितो आहे की मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक क्षेत्राचा विकास झाला. समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध योजनांमधून केलं. भाजपा बूथमध्ये काम करणारा व्यक्ती देशाचा राष्ट्रपतीही होऊ शकतो आणि पंतप्रधान होऊ शकतो हे आपण पाहिलं आहे. कारण आपला पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे.



लांगुलचालन आणि घराणेशाही जपणार्‍या पक्षांचं नेतृत्व काँग्रेसकडे..


विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत अमित शाह म्हणाले, “लांगुलचालन करणारे आणि घराणेशाही जपणारे जे पक्ष आहेत त्यांचं नेतृ्त्व काँग्रेस पक्ष करतो आहे. मात्र भाजपाची प्राथमिकता राष्ट्र प्रथम ही आहे. आपण विकासाचा विचार करतो, मात्र विरोधी पक्षांचा गट असलेली इंडिया आघाडी आणि त्यातले नेते हे आपल्याच मुलांना पंतप्रधान होता येईल का? मुख्यमंत्री कसं होता येईल? यासाठी त्यांचेच चेहरे समोर आणतात. दलित, आदिवासी समाज यांचा वापर इंडिया आघाडीने फक्त व्होट बँक म्हणून केला आहे. मात्र या वर्गाला समान वाटा देण्याचं काम हे आपल्या मोदी सरकारने केलं आहे.” असं अमित शाह म्हणाले.



इंडिया ही घमंडियांचीच आघाडी


आपण इंडिया आघाडीकडे पाहिलं तर ती घमंडिया आघाडी आहे हेच आपल्याला दिसतं. कारण या आघाडीत भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगुलचालन याला प्रोत्साहन देणारे लोक आहेत. मात्र भाजपा किंवा एनडीए तशी नाही. आपण आपल्या तत्त्वांवर वाटचाल करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेत आले की ते घराणेशाही, दहशतवाद आणि नक्षलवाद संपवतील यात शंकाच नाही, असंही अमित शाह म्हणाले.



केजरीवालांवरही केली टीका


आप या पक्षावर टीका करताना अमित शाह म्हणाले, “आम आदमी पक्षाने मद्य घोटाळा, मोहल्ला क्लिनिक घोटाळा यांसारखे अनेक घोटाळे केले. लोकांच्या मेडिकल टेस्टचाही घोटाळा या पक्षाने केला. त्यामुळेच या पक्षाचे प्रमुख केंद्रीय तपासयंत्रणांपासून पळ काढत आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली.

Comments
Add Comment