Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजवनवृक्षारोपण

वनवृक्षारोपण

कथा: प्रा. देवबा पाटील

देशमुख सर आठव्या वर्गाच्या मुलांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगत होते आणि मुले आनंदाने त्यांना आपल्या शंका विचारीत होती. असे खेळीमेळीत शिकवणे सुरू होते. “सर, आपण तर आपल्या गावात वृक्षारोपण जरूर करू. पण झाडांचे जर एवढेे महत्त्व आहे तर डोंगरांवर का नाही झाडे लावत? सगळे डोंगर बोडखे झालेत व त्यातील हरणे, रानडुकरे, रोही, माकडे, नीलगायी असे अनेक जंगली प्राणी शेतात येऊन शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करून राहिलेत. ते कळपाच्या कळपाने येतात व सारे पीक फस्त, उद्ध्वस्त करून जातात. शेतकरी बरबाद होत आहे. पण त्यांची दखल कोणीच घेत नाही. हे योग्य आहे का सर?” नंदाने प्रश्न केला.

“खूप छान प्रश्न केला तू नंदा.” सर म्हणाले, “खरे तर साऱ्या डोंगरांवर मोठमोठे वृक्ष लावायला पाहिजेत व सगळे डोंगर हिरवेगार करायला हवेत. डोंगरांवरील गगनचुंबी वृक्ष हे पावसाचे ढगही अडवितात व पाऊस पडायला मदत होते.” सर पुढे सांगू लागले, “डोंगरांवरील उतारांवरून पावसाचे पाणी सपाट भागाकडे वाहत जाते. ते पाणी स्वत:सोबत डोंगरांवरील मातीही खूप वाहून नेते. डोंगरावर झाडे असली, तर पावसामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोंगरांची झीज कमी होते. पण डोंगर हे सरकारच्या ताब्यात असतात. त्यामुळे डोंगरांवर वृक्षारोपणाची मोहीम शासनानेच हाती घ्यायला पाहिजे. ते आपल्या हाती नाही.

पण आपण आपल्या गावात रिकाम्या जागांवर, गावच्या माळरानावर, रस्त्यांच्या व सडकेच्या दोन्ही बाजूंना आणि आपल्या शेतशिवारातही जरूर झाडे लावू. झाडे जमिनीची धूप थांबवतात. झाडे वातावरणातील उष्णता शोषून घेतात. म्हणून झाडांमुळे थंडीच्या दिवसांत वातावरण ऊबदार राहते. झाडे भरपूर दाट सावली देतात. त्यामुळे उन्हाळ्यात वातावरणात गारवा राहतो व उन्हाची बाधा कमी होते. झाडे हे प्रदूषित वायू आणि उष्णता या दोन्हींपासून मानवाचे रक्षण तर करतातच; परंतु वातावरणातील मानवाच्या जीवनोपयोगी ओझोन वायूचे प्रमाण कायम राखण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे झाडे त्यांच्या मुळांद्वारे जमिनीतील क्षार, खनिजे, रसायने घेऊन आपणास अमृतासमान गोड फळे देतात. तसेच निंब, वड, पिंपळ अशा काही झाडांचा उग्र दर्प हवेत मिसळल्याने वातावरणातील किटाणूही नष्ट होतात.”

“पण सर एक शंका आहे?”
नरेंद्राने म्हटले.
“बोल? विचार तुझी शंका?”
सर म्हणाले.
“पण झाडे कोणती लावायची सर? कारण सुबाभुळसारखी काही झाडे साध्या वादळातही मोडून पडतात आणि ती मोडून जर घरांवर पडली, तर खूप नुकसानही होते व एखादवेळी जीवितहानीही होऊ शकते.”

“बरोबर शंका काढलीस नरेंद्रा तू.” सर सांगू लागले, “अरे कोणत्या झाडांवर घरटे बांधावे व कोणत्या नाही हे पक्ष्यांनाही समजते. ज्या विदेशी झाडांवर पाखरेही आपली घरटी बांधीत नाहीत, अशी फक्त दिसायला चांगली असणारी पाश्चात्त्य ठिसूळ व निरुपयोगी झाडे आपण मुळीच लावणार नाहीत. आपण जी झाडे लावू ती सगळी आपली भारतीय मजबूत अशी गावरान व उपयुक्तच झाडेच लावू. कारण ती आपल्या देशाच्या वातावरणात केवळ पावसाच्या भरवशावरच चांगली वाढतात. त्यांची अति निगा राखावी लागत नाही. ती लवकर मोठी होतात, पशुपक्ष्यांना निवारा देतात व भरपूर सावलीही देतात. त्यांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे साध्या-सुध्या वादळात ती उन्मळून पडत तर नाहीच, पण ती मजबूत असल्याने सहसा मोडूनही पडत नाहीत. त्यांच्या खोलवर गेलेल्या मुळांमुळे जमिनीत पावसाचे पाणीही चांगले मुरते व त्या परिसरातील विहिरींनाही पाणी येते.

आता तर विज्ञानानेही सिद्ध केले आहे की, आपली भारतीय झाडेच वातावरणातील विषारी कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात शोषून घेतात आणि चांगला भरपूर प्राणवायू वातावरणात सोडतात. त्यामुळे आपण अशीच कडूनिंब, गोडनिंब, वड, पिंपळ, आंबा, चिंच, जांभुळ, नारळ, गोड बदाम, कडू बदाम, कढीपत्ता, औदुंबर, कदंब, फणस, अननस, चिकू, अंजिर अशी झाडे मोठमोठ्या चौकांत लावू. म्हणजे औषधांसाठी काही झाडांची पाने, फुले, फळे आपल्या कामी येतील व ऋतूनुसार काही झाडांची फळेही आपणास खायला मिळत जातील आणि…” आणि सरांचा तोही तास संपला. “अरे मुलांनो आजचाही तास संपला आणि आपले बरेच प्रकरण राहिले आहे. तुम्हाला जास्त वेळ थांबवून ठेवणे योग्य नाही. आता आपण राहिलेले पुढच्या तासाला घेऊ.” असे सांगून सर वर्गाच्या बाहेर पडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -