रवींद्र तांबे
विद्यार्थ्यांच्या जीवनात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या असतात. याच परीक्षांमुळे त्यांच्या जीवनाची खरी दिशा ठरत असते. बोर्डाच्या परीक्षेचा विचार करता पहिली प्रात्यक्षिक परीक्षा नंतर लेखी परीक्षा असते. या दोन्ही परीक्षांचे एकत्रित गुण विद्यार्थ्यांना दिले जातात हे प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या असतात. त्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी व परीक्षा कालावधीत पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
खरं म्हणजे, मुलांच्या परीक्षेचा कालावधी जवळ आला की, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या तणावात दिसतात. अशा वेळी दोघांनीही एकमेकांना आधार द्यायचा असतो. बरेच पालक मुलांच्या परीक्षेच्या कालावधीत कामावर न जाता रजा काढून मुलांबरोबर घरीच असतात. तेवढा त्यांना आधार वाटत असतो. तरीसुद्धा यात पालकांनी खचून न जाता मुलांना सांगितले पाहिजे की, आपण वर्षभर खूप मेहनत घेऊन अभ्यास केलेला आहे. कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेता बोर्डाची परीक्षा दिली पाहिजे. आतापर्यंत वर्ष सुरू झाल्यापासून तिमाही, सहामाही, पूर्व परीक्षा आणि सराव परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा चांगले गुण संपादन केलेले आहेत. तेव्हा आता एकच लक्ष असले पाहिजे ते म्हणजे बोर्डाची लेखी परीक्षा. अगदी आनंदाने आणि हसत मुखाने बोर्डाची परीक्षा देईन अशी प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द डोळ्यांसमोर ठेवावी. हीच खरी बोर्डाच्या परीक्षेची तयारी आहे.
आता आपण परीक्षा काळात पालकांनी कशा प्रकारे आपल्या मुलांची काळजी घ्यावी याचा थोडक्यात आढावा घेऊ.
प्रथम आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक घरात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावे. म्हणजे आज कोणत्या विषयाची परीक्षा आहे हे चटकन समजते. बऱ्याच वेळा आपल्या समोर वेळापत्रक नसते आणि जवळची व्यक्ती सांगते, उद्या अमुक विषयाची परीक्षा आहे. अशा वेळी आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. यासाठी पालकांनी परीक्षेचे वेळापत्रक घरातील मोक्याच्या ठिकाणी लावावे. त्यासाठी वेळेचे नियोजन योग्य प्रकारे पालकांनी करावे. महत्त्वाची बाब म्हणजे, परीक्षेच्या दिवशी परीक्षेला जाताना आवश्यक कागदपत्रे व साहित्य घेतले की नाही याची खात्री करूनच घरातून परीक्षा केंद्रावर जायला निघावे. परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर कोणत्या खोलीमध्ये आपल्या मुलांचा आसन क्रमांक आहे याची खात्री करावी. कोणत्याही प्रकारे कॉपी म्हणून पकडले जावू नये अशा वस्तू मुलांसोबत देऊ नयेत. उदाहरणार्थ नोट्स, पुस्तक किंवा महत्त्वाचे मुद्दे असलेली डायरी इत्यादी होय. जरी परीक्षा केंद्रावर घेऊन गेले असेल तरी आपल्या बॅगेत ठेवायला सांगणे. कोणत्याही प्रकारचे नकारात्मक बोलू नये. परीक्षेच्या दिवशी मुलांचा उत्साह वाढवावा.
बऱ्याच वेळा शाळेतील परीक्षेत वेगवेगळ्या पेनांचा वापर करून उत्तर पत्रिका लिहिली जाते. मात्र बोर्डाच्या परीक्षेत असे चालत नाही. त्यामुळे निळ्या शाईच्या पेनाने लिहावे. दोन किंवा तीन पेन जवळ ठेवावेत. त्या आधी त्या पेनाने लिहिण्याचा सराव करावा. असे पालकांनी मुलांना आधीच सांगावे. त्याचप्रमाणे परीक्षागृहात गेल्यावर ज्या सूचना पर्यवेक्षक सांगतील त्या नीट ऐकाव्यात. जर समजले नसेल, तर पुन्हा पर्यवेक्षकाला विचाराव्यात. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही काही विचारू नये, बोलू नये. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर फळ्यावर लिहिलेल्या काही सूचना असतील, तर त्या काळजीपूर्वक वाचाव्यात असे परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी एक मार्गदर्शक म्हणून पालकांनी आपल्या मुलांना सांगावे. तसेच योग्य सूचनांचे पालन करावे असा वडिलकीचा सल्ला सुद्धा मुलांना द्यावा.
आपला आसन क्रमांक अचूक लिहावा. कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नये. जर चुकीचे लिहिले गेले असेल आणि त्यांनतर आपल्या लक्षात आल्यावर त्यावर काट मारून पर्यवेक्षकाची सही घ्यायला विसरू नये हे सांगावे. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रश्नपत्रिकेवर ज्या सूचना दिलेल्या असतील त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच वेळेचे नियोजन करून वेळेत विचारलेले प्रश्न सोडविण्यात यावेत. तेव्हा प्रश्नांची उत्तरे लिहिताना वेळेकडे लक्ष द्यावे हे आवर्जून मुलांना सांगायला हवे.
परीक्षा कालावधीत घरी असताना थोडावेळ खेळ सुद्धा मुलांनी खेळायला हवा. मात्र कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी पालकांनी घ्यावी. त्याप्रमाणे मुलांच्या दररोजच्या आहारामध्ये बदल करू नये. असे असले तरी मुलांच्या मनावरील ताण वाढणार नाही याची प्रत्येक पालक काळजी घेत असतात. परीक्षा कालावधीत घरातील वातावरण हलके – फुलके व अनुकूल ठेवावे. टीव्ही, रेडिओ, डेक यांना आराम द्यावा. काही जोकसुद्धा आवश्यक वेळी करावेत. त्यामुळे अनाठायी वेळ जातो.
एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही याचे महत्त्व मुलांना सांगावे. पुस्तके, नोट्स पटकन मिळतील, अशा ठिकाणी ठेवावीत. कोणत्याही प्रकारच्या कारणामुळे मुलांचा ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. या काळात मुलांच्या चुका जरी झाल्या तरी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळायला हवी. अगदी टोकाची भूमिका घेऊ नये. तेव्हा बोर्डाच्या परीक्षेमध्ये मुलांना उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी परीक्षा कालावधीत आपल्या मुलांची काळजी पालकांना घ्यावी लागेल.