मोदी है तो मुमकीन हैं, असे गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये बोलले जात आहे. २०१४ नंतर देशामध्ये मोदी पर्वाच्या नेतृत्वाखाली चालविला जाणारा कारभार पाहिल्यावर या वाक्याची प्रचिती पावलापावलावर येऊ लागली आहे. ‘अनहोनी को होनी कर दे’ अशा थाटात पंतप्रधान मोदींचा कारभार सुरू आहे. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ याची मात्र पंतप्रधान मोदींच्या कारभाराकडे पाहिल्यावर खात्री पटते.
२०१४ पूर्वी भारतामध्ये राम मंदिर होईल, बाबरी मशिदीच्या जागी भव्यदिव्य असे रामलल्लाचे मंदिर उभारले जाईल, असे कोणी म्हटले असते तरी त्याला कोणीही मूर्खात काढले असते, अशी परिस्थिती होती. या देशात सर्वांधिक हिंदू असतानाही हिंदूंचे दैवत असलेल्या प्रभू रामचंद्राला त्यांच्याच जन्मभूमी असलेल्या अयोध्येत मंदिरासाठी तब्बल ५०० वर्षांची प्रतीक्षा करावी लागली, ही आपल्या हिंदुत्वाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. आपण खरोखरीच हिंदू म्हणविण्याच्या लायकीचे आहोत का? आपले हिंदू रक्त खरोखरीच इतके थंड असू शकते? असा प्रश्न निर्माण होण्याइतपत या देशामध्ये परिस्थिती होती; परंतु २०१४ ला देशामध्ये मोदीपर्व सुरू झाले आणि देशाची वास्तवात हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू झाली, असे म्हणणे आजच्या घडीला अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. हिंदू धर्मियांना ज्या गोष्टीची आतुरता होती, उत्सुकता होती, त्याची पूर्ती झाली. दररोज लाखोंच्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. मोदीविरोधक असाही डंका पिटतील, यात नावीन्य ते काय? हिंदू धर्मियांच्या हिंदुस्थानात राम मंदिराची उभारणी झाली, यात विशेष ते काय? बरोबरही असेल कदाचित मोदी विरोधकांचे म्हणणे? परंतु जे तुम्हाला १९४७ पासून साध्य झाले नाही, ते मोदी यांनी शक्य करून दाखविले आहे. नुकतेच अबुधाबीमध्ये उभ्या राहिलेल्या हिंदू मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले.
अबुधाबी, यूएई, कट्टर आणि कडवट असलेल्या इस्लामी लोकांची भूमी. त्या भूमीवर हिंदू मंदिर उभे राहिले आहे आणि यात पडद्याआडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोदी नसते, तर कदाचित अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर उभेच राहिले नसते व कट्टर मुस्लीम राजवटीत हिंदुत्वाचा जागर झालेलाही आपणास पाहावयास मिळाला नसता. संयुक्त अरब अमिरातीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले. अबुधाबी येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे. उद्घाटनाच्या वेळी स्वामीनारायण संप्रदायाचे प्रमुख संत, स्वामी, तसेच देश आणि विदेशातून निमंत्रित करण्यात आलेले मान्यवर उपस्थित होते.
‘बी.ए.पी.एस. (बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था) हिंदू मंदिर’ असे या मंदिराचे नाव आहे. सकाळी या मंदिरामध्ये श्री व्यंकटेश, श्री गणेश, भगवान शिव आदी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १ मार्चपासून भाविकांना हे मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या परिसरात फिरून मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांना संतांकडून माहिती देण्यात आली. मंदिराचा लोर्कापण सोहळा आपण पाहिला, पण मंदिर उभारणीमागील पंतप्रधान मोदी यांचे योगदान व भूमिका आपण भारतीयांनी जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे.
‘बी.ए.पी.एस. हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे. अबू मुरीकाह जिल्ह्यात स्थित, ही भव्य रचना भारत आणि यूएई यांच्यातील चिरस्थायी मैत्रीचा पुरावा आहे. सांस्कृतिक सौहार्द आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे. अबुधाबी येथील या मंदिरात उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातील हे पहिले हिंदू शैलीतील मंदिर आहे. बी.ए.पी.एस. हे यूएईमधील पहिले हिंदू मंदिर आहे. बी.ए.पी.एस. हिंदू मंदिर गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी यूएईमध्ये नेण्यात आले.
अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर जमीन दान करण्याचे जाहीर केले होते. जवळपास हे मंदिर होण्यासाठी पंतप्रधान मोदी हे आठ-नऊ वर्षे संबंधितांच्या संपर्कात होते. देशाचा पंतप्रधान एखाद्या गोष्टीबाबत किती जागरूक असू शकतो, हे यानिमित्ताने पाहावयास मिळाले. अशा प्रकारे एकूण २७ एकर जमिनीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. बी.ए.पी.एस. मंदिराचे सात स्पायर्स प्रत्येक यूएईच्या अमिरातीचे प्रतीक आहेत.मंदिराच्या संकुलात अभ्यास केंद्र, प्रार्थना हॉल, थीमॅटिक गार्डन, शिक्षण क्षेत्र यांचा समावेश आहे. मंदिराच्या पायामध्ये १०० सेन्सर बसवण्यात आले आहेत. भूकंप, तापमान बदल तपासण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी ४०० दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम म्हणजेच जवळपास ७०० कोटी इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे.
अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर झाले म्हणजे विषय संपला अशातला भाग नाही. इस्लामी देशात हिंदू मंदिरातील घंटानाद घुमू लागला आहे, हेही नसे थोडके. तिथे आता आरत्या होतील. इस्माली देशात हिंदुत्वाचा गजर सुरू झाला आहे. तो थांबणार नाही. अबुधाबीपाठोपाठ बहरीनमध्ये हिंदू मंदिर उभे राहणार असून त्यासाठी तेथील राजाकडूनही जमीन घेण्यात आली आहे. १फेब्रुवारी २०१९ रोजी बहरीनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांनी स्वामीनारायण हिंदू मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याची घोषणा केली होती. मंदिराच्या बांधकामाबाबत बीएपीएस शिष्टमंडळाने बहरीनच्या राज्यकर्त्यांची भेट घेतली. मंदिरासाठीची जमीन बहरीन सरकारने दिली असून बांधकामाची औपचारिकताही पूर्ण झाली आहे. ज्या देशांशी आपले एकेकाळी सख्य नव्हते, तिथे मोदींमुळे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. कट्टर मुस्लीम राष्ट्रांमध्ये हिंदू मंदिरे उभी राहत आहेत. जे पूर्वीच्या राज्यकर्त्यांना शक्य झाले नाही, ते मोदी यांनी कोणताही गाजावाजा न करता करून दाखविले आहे. उगीच नाही म्हणत, ‘मोदी हैं तो मुमकीन हैं।’