
नाशिक विभागीय कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू
नाशिक : राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या आर्थिक मागण्यांवर शासन, प्रशासन पातळीवर झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू असून उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. नाशिक विभागीय कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात येत आहे. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
शासन पातळीवर झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयाचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे.
राज्य परिवहन कामगारांना महामाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराची थकबाकी मिळावी, त्रिसदस्यीय समितीची बैठक लवकर आयोजित करून सकारात्मक निर्णय घ्यावा, महामाई भत्ता थकबाकीसह लागू करावा, कामगारांना थकबाकी द्यावी, हिट ॲण्ड रनचा कायदा रद्द करावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयक रकमा तत्काळ देण्यात याव्या, या मागण्यांकरिता विभागीय कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येत आहे.
एसटी कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत. मागण्यांबाबत कोणताच विचार होत नसल्याने एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत.
या आंदोलनानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा देखील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे. सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी १३ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.