
कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची शतकी खेळी केली तर रवींद्र जडेजा १०० धावांवर नाबाद आहे. जडेजा आता दुसऱ्या दिवशीही मैदानात उतरणार. तर सरफराज खानने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत ६६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. यात त्याने १ षटकार आणि ९ चौकार लगावले.
मात्र सर्फराजला शतक ठोकता आले नाही आणि तो रनआऊट झाला. जडेजा ९९ धावांवर खेळत होता. त्याने शॉट लगावत एका धावेसाठी हाक दिली. मात्र फिल्डरच्या हातात बॉल जाताना पाहून त्याने धाव घेण्यास नकार दिला. तोपर्यंत सर्फराज खूप पुढे आला होता आणि तो रनआऊट झाला.

यासाठी आता जडेजाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सर्फराजची माफीही मागितली. जड्डू म्हणाला ही त्याचीच चूक होती. जडेजाने माफी मागताना लिहिले, सर्फराजसाठी खूप वाईट वाटत आहे.तो माझा चुकीचा कॉल होता. सर्फराज खूप चांगला खेळला.
सर्फराज रनआऊट झाल्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये रोहितही भडकला होता. त्याने आपल्या टोपी काढून जमिनीवर आपटली.