राजकोट: राजकोट कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या २ बाद २०७ धावा इतकी झाली आहे. या पद्धतीने इंग्लंड दुसऱ्या दिवसअखेर २३८ धावांनी पिछाडीवर आहे. आजचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर बेन डकेट आणि ज्यो रूट नाबाद परतले. बेन डकेट १३३ धावांवर खेळत आहे. तर ज्यो रूट ९ धावांवर आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. भारतासाठी रवी अश्विन आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले. रवी अश्विनने जॅक क्राऊलीला बाद केले. यासोबत रवी अश्विनने कसोटी फॉरमॅटमध्ये ५०० विकेटचा आकडा पार केला. जॅक क्राऊलीने १५ धावा केल्या. ओली पोप ३९ धावा बनवून मोहम्मद सिराजची शिकार बनला.
भारतीय संघाच्या ४४५ धावा
याआधी भारताचा पहिला डाव ४४५ धावांवर आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ५ बाद ३२६ वरून खेळण्यास सुरूवात केली. मात्र पहिल्या दिवशी नाबाद राहिलेले रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव लवकर परतले. मात्र ध्रुव जुरेल, रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी महत्त्वाचे योगदान दिले.