मुंबई: ३३ धावांवर ३ विकेट आणि त्यानंतर २३७ धावांवर ४ विकेट ही आहे राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाची कहाणी एका ओळीत. रोहित शर्माने(rohit sharma) राजकोटमध्ये पुन्हा एकदा दाखवले की तो टीम इंडियाचा सर्वात मोठा संकटमोचक आहे. आज आपल्या शतकीय खेळीदरम्यान त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांनी बनवलेल्या दलदलीतून भारतीय संघाला बाहेर काढले. या दरम्यान त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. त्याने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या मालिकेला राजकोटमध्ये सुरूवात झाली आहे. सामन्यास रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय फसतोय की काय असे वाटले कारण भारताने अवघ्या ३३ धावांत ३ विकेट गमावल्या. येथूनच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा संघासाठी धावून आले. दोघांनी भारताला संकटातून बाहेर काढले.
या दरम्यान कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची शानदार शतकी खेळी केली. रोहितने कसोटीतील आपले ११वे शतक ठोकले. १० डावांनंतर हे शक्य झाले. याआधी रोहितने आपले शेवटचे कसोटी शतक जुलै २०२३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते.
३६ वर्षीय रोहित शर्माने २१८ दिवसांनी आपले कसोटी शतक ठोकले. तर या सामन्यात रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीला षटकार ठोकण्याच्या बाबतीतही मागे टाकले. धोनी कसोटी सामन्यांमध्ये एकूण ७८ षटकार ठोकले आहेत. तर हिटमॅनने कसोटीत एकूण ८० षटकार ठोकलेत.
रोहित शर्माने आजच्या शतकीय खेळी दरम्यान ३ षटकार ठोकले. तर भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. या क्रिकेटरने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९० षटकार ठोकले होते.