Thursday, July 10, 2025

Odisha News : चिता जाळण्यापूर्वी घडला चमत्कार! चितेवरील महिलेने डोळे उघडले आणि...

Odisha News : चिता जाळण्यापूर्वी घडला चमत्कार! चितेवरील महिलेने डोळे उघडले आणि...

नातेवाईकांनी हाक दिली आणि सरणावर असलेल्या महिलेने प्रतिसाद दिला


भुवनेश्वर : ओडिशामधून (Odisha) एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एक महिला आगीत भाजल्याने तिचा श्वासोच्छवास काही काळासाठी बंद पडला होता. ती मृत झाल्याचे समजून तिच्या नातेवाईकांनी तिला स्मशानभूमीत नेले. मात्र, चिता (pyre) जाळणार इतक्यात त्या महिलेने डोळे उघडले आणि उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. गंजममधील बेरहामपूरमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.


गुड्स शेड रोड परिसरात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराला १ फेब्रुवारीला आग लागली. त्यात महिला ५० टक्के भाजली. तिला तातडीने एमकेजीसी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी महिलेला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं. पण उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्यानं महिलेचा पती तिला घरी घेऊन आला.


महिलेला घरी आणण्यात आलं तेव्हा तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. सोमवारी तिने डोळे उघडले नाहीत. महिला श्वास घेत नसल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा कुटुंबाचा समज झाला. कुटुंबियांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला न घेता, मृत्यू प्रमाणपत्र न घेता कुटुंबियांनी महिलेचा मृतदेह बिजीपूर स्मशानभूमीत नेला.


अंत्यविधींची तयारी सुरू करण्यात आली. चिता रचण्यात आली. त्यावर पार्थिव ठेवण्यात आलं. तितक्यात महिलेनं अचानक डोळे उघडले. त्यामुळे सगळेच चकित झाले. उपस्थितांनी महिलेला साद घातली. तिने प्रतिसाद दिला. त्यामुळे तिथे हजर असलेल्या सगळ्यांना चमत्कार पाहायला मिळाला. घटनेची माहिती स्थानिक नगरसेवकाला देण्यात आली. महिलेला शववाहिकेतून स्मशानभूमीत आणण्यात आलं होतं. त्याच वाहनातून तिला पुन्हा घरी नेण्यात आलं. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment