Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीजागतिक बँकेच्या पथकाकडून कोल्हापूरच्या पूरप्रवण भागाची पाहणी

जागतिक बँकेच्या पथकाकडून कोल्हापूरच्या पूरप्रवण भागाची पाहणी

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण व पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यासाठी ३२०० कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेची मंजुरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली. या पथकात जोलांथा क्रिस्पीन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोव्हर यांचा समावेश होता. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता (उत्तर) स्मिता माने, कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या पथकाने व्हीनस कॉर्नर, सुतार वाडा, आंबेवाडी, प्रयाग चिखली, राजाराम बंधारा व पंचगंगा नदीवरील शिरोली येथील पुल या क्षेत्रांची तसेच जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरातील भूस्खलन परिस्थितीची व दुधाळी येथील महानगरपालिकेच्या एसटीपी प्लॅन्टची पाहणी केली. तसेच पूर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपाययोजनांबत चर्चा केली.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण व पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येणार आहे. यातील ३२०० कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यातील पूर परिस्थिती, पूर परिस्थितीत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी, पुरामुळे शेती, होणारे नुकसान, बाधित गावे, भूस्खलन होणारी गावे या विषयीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या पथकाला दिली.

पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदीच्या वाढत जाणाऱ्या पाणी पातळीच्या नोंदी सन १९८८ पासून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळीवरुन घेण्यात येतात. यावरुन पूर परिस्थितीचा अंदाज घेतला जातो, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -