राजकोट: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६ धावा केल्या. रवींद्र जडेजाचे नाबाद शतक, कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि सर्फराज खानचे पदार्पणातील अर्धशतक यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी तीनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठला.
पहिल्या दिवसाच्या सुरूवातीलाच ३ बाद ३३ अशी अवस्था असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी खेळपट्टीवर टिकून राहत भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. तब्बल २१८ दिवसांनी रोहित शर्माने कसोटीतील शतक ठोकले.
रोहितने १९६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १३१ धावा तडकावल्या. रोहितने या सामन्यात षटकार ठोकण्याच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले.
त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. रवींद्र जडेजाने दिवसअखेर नाबाद ११० धावा केल्यात. या खेळीत जडेजाने आतापर्यंत ९ चौकार आणि २ षटकार ठोकलेत. यासोबतच सर्फराज खाननेही या पदार्पणाच्या सामन्यात ६२ धावांची तुफानी खेळी केली.
सर्फराज खानने ६६ बॉलमध्ये ९चौकार आणि १ षटकार लगावताना ६२ धावा ठोकल्या. त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ५ बाद ३२६ धावांवर खेळत होता.
इंग्लंडकडून मार्कवूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर टॉम हार्टलेला एक बळी मिळवता आला. जेम्स अँडरसन आणि रेहान अहमद यांना एकही बळी मिळवण्यात यश मिळाले नाही.