आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई : भाजपाला ४०० पार होऊ देणार नाही, हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रथम विचार करावा आणि मगच आमच्यावर बोलावे, असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीने महत्त्वाची माहिती दिलेली आहे की, शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. ही अर्धीच बातमी असून त्याचा पुढील टप्पा म्हणजे केवळ शरद पवार गट नाही, तर उबाठा गट हा ही काँग्रेसमध्ये विलीन करावा, अशी चर्चा अंतिम टप्प्यात सुरू आहे. जेणेकरून येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका उद्धव ठाकरे आणि पवार गटाचे सर्व उमेदवार हे काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर लढतील, अशा पद्धतीची शक्यता आता निर्माण झाली आहे.
पुढे नितेश राणे म्हणाले की, स्वाभिमान पक्ष आम्ही काढला होता तेव्हा आम्ही दोन निवडणूक लढलो होतो. एक कणकवली नगर पंचायत आणि दुसरी लोकसभेची निवडणूक लढलो. कणकवली नगर पंचायत निवडणुकीसाठी आम्हाला कप बशी चिन्ह दिले होते. तर लोकसभेसाठी फ्रीज हे चिन्ह दिले गेले होते. याचा अर्थ असा होतो की, मशाल चिन्ह हे उबाठा गटाला अंधेरी पोटनिवडणुकीपुरते मिळाले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांना वेगळे चिन्ह निवडावे लागेल. तशीच अवस्था शरद पवार गटाची आहे. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने उद्धव ठाकरेंचा हात काँग्रेसच्या हातात, अशी परिस्थिती तयार झाली असल्याचे नितेश राणे म्हणाले.
आदर्श घोटाळ्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळातही होता. तेव्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाण वाईट वाटले नाहीत. मग आता आमच्याकडे चव्हाण आल्याने त्यांना भ्रष्टाचारी म्हणणे योग्य नसल्याचे आमदार राणे म्हणाले.