Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआपल्याला कोणी गॅस लाइटिंग तर करत नाही ना?

आपल्याला कोणी गॅस लाइटिंग तर करत नाही ना?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

डार्क सायकॉलोजी किंवा इमोशनल मॅनिप्युलेशनबद्दल आपल्याला कल्पना असेलच. त्याचाच एक प्रकार आहे गॅस लाइटिंग करणे. कोणत्याही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला इतके जास्त स्वतःचं म्हणणे पटवून देणे, तेही सातत्याने पटवून देणे, ठासून सांगणे जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला तेच खरं, तेच सत्य आहे याची शंभर टक्के खात्री होईल. आपले स्वतःचे विचार, अनुभव, आपली माहिती, आपल्याला इतरांनी सांगितलेली माहिती, आपलीच व्यक्तिगत भूमिका काय असावी, आपलं अस्तित्व हे सगळं विसरून फक्त आणि फक्त समोरचा जे सांगतोय तेच आपल्याला योग्य वाटायला लागते.

कोणत्याही नात्यात गॅस लाइटिंग वापरून एक जण दुसऱ्याला किंवा इतरांना स्वतःचे म्हणणे, स्वतःचे विचार, निर्णय आणि कृती कशी एकदम बरोबर आहे हे सतत सांगून त्यांच्या विचारशक्तीला, त्यांच्यातील निर्णयशक्तीला पूर्णपणे काबीज करून स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांना वागायला भाग पाडतो. सतत सतत कोणतीही गोष्ट पटवून देऊन ती गळी उतरविणे यासाठी गॅस लाइटिंग वापरले जाते. गॅस लाइटिंग हे एकाच वेळी किंवा एकदाच केले जात नाही किंवा एक व्यक्ती फक्त एकालाच करीत नाही, तर एक व्यक्ती अनेकांना, कुटुंबाला, मित्र-परिवाराला सुद्धा करते. समोरील व्यक्ती जशी जशी जितकी जास्त संपर्कात येईल, आपल्या कंट्रोलमध्ये येईल, आपल्यात मानसिक, भावनिक दृष्टीने गुंतत जाईल तसतसे जास्त प्रमाणात केले जाते. कोणतीही व्यक्ती आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये आणणे आणि त्या व्यक्तीला सत्य परिस्थितीचा विसर पडणे हाच यामागील उद्देश असतो.

आपले निर्णय, आपली वागणूक, स्वभाव, आपली प्रत्येक गोष्ट आपण दुसऱ्याला सांगणे, शेअर करणे-विचारणे, त्यानेच आपल्याबद्दल सर्व ठरविणे, आपल्याला स्वतःच विचार करायला पण वेळ किंवा स्वातंत्र्य मिळू न देणे इतकी ती व्यक्ती आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवते. त्याच्याशिवाय आपले जगचं नाही, त्याच्याशिवाय आपले अस्तित्वच नाही, असा ठाम समज गॅस लाइटिंग झालेल्या व्यक्तीचा होतो. आपण सारखं सारखं जे पाहतो, जे ऐकतो, जे आपल्याला दाखविले जाते त्यावर आपला विश्वास ठाम होतो. आपण स्वतःची सदसदविवेकबुद्धी वापरू शकत नाही इतका डोळे झाकून त्या व्यक्तीच्या आहारी जातो. आपले अंतर्मन, आपली इच्छाशक्ती, आपली वैचारिक शक्ती इतकी दुबळी होते की आपण प्रत्यक्षात कसे आहोत, कोण आहोत, हे सुद्धा विसरतो.

गॅस लाइटिंग करताना कोणाला त्रास देण्याची, वाईट बोलण्याची सुद्धा गरज पडत नाही. अगदी ठरवून, ज्याला गॅस लाइटिंग करायचे आहे त्या व्यक्तीला प्रेमात घेऊन, सतत त्याची काळजी घेऊन अथवा दाखवून, सतत सारखे त्याला आपल्यासाठी ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे हे सांगून, दाखवून, त्या व्यक्तीला पदोपदी नात्याची आठवण करून देऊन, सारखे त्याला जवळ ठेवण्याचा प्रयत्न करून, त्याच्या कुठे पण जाण्या-येण्यावर सुद्धा बंधन घालून पण ती प्रेमाने, इतके बांधून ठेवले जाते की आपण आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचे आहे, आपले ध्येय काय आहे, आपली दिशा काय आहे, हे विसरून आपण त्याचे आयुष्य जगू लागतो. आपल्या आयुष्याचे सर्व निर्णय त्याच्या स्वाधीन करतो. आपण काय बोलावे, कुठे बोलावे, कोणाशी बोलावे, कोणाशी बोलू नये, किती बोलावे इतपासून ते आपल्या सर्व सवयी, हालचाली सुद्धा नियंत्रित केल्या जातात.

गॅस लाइटिंग झालेली व्यक्ती हे स्वतःला दुसऱ्यामध्ये इतके समर्पित करते, दुसऱ्यावर इतका विश्वास ठेवते की इतर कोणीही कितीही डोळे उघडण्याचा, सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही. जी व्यक्ती गॅस लाइटिंग करीत आहे तिला स्वतःचे अनेक हेतू, स्वार्थ साधून घ्यायचे असतात, ते पण गोड बोलून, प्रेम, काळजी, सहानुभूती, खोटी वचने, खोट्या आणाभका, खोटी अवस्था दाखवून तो हे करीत असतो. तो आपल्यासाठी त्रास आहे, त्यामुळे आपले आयुष्य आपण जगतच नाही अथवा आपले व्यक्तिगत व्यक्तिमत्त्व आहे, आपले काही प्राधान्य आहेत, आपण चुकतोय, फसतोय हे सुद्धा लक्षात येत नाही. आपल्यासाठी हे त्रासदायक होणार आहे, आपण चुकीच्या व्यक्तीमध्ये अडकत आहोत, हे सुद्धा समजत नाही.

एखादा अत्यंत छान वागून, प्रचंड जवळीक निर्माण करून, आपल्याला डोक्यावर घेऊन, आपल्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो, प्रमाणापेक्षा जास्त करतो त्यात सुद्धा गॅस लाइटिंग असते, कारण त्यात त्याचा कोणताही छुपा उद्देश असतो.
गॅस लाइटिंग जास्त करून रिलेशनशिपमध्ये वापरले जाते. नवरा – बायको, प्रियकर – प्रेयसी, विवाह झालेला असताना पण परस्त्री अथवा परपुरुषाशी संबंध असणारे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे, गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड यांच्यामध्ये हे प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळतात.

एकमेकांना ताब्यात ठेवण्यासाठी, हुकूमत गाजविण्यासाठी, दुसऱ्यावर मालकी हक्क दाखविण्यासाठी, समोरचा आपल्या शब्दाच्या पलीकडे जाणार नाही, आपण सांगू तेच तो खरे समजेल, इतरांच्या सल्ल्याने, मताने अगदी स्वतःच्या मनाप्रमाणे सुद्धा तो वागू शकणार नाही इतके त्याला आपल्या प्रभावात ठेवणे यासाठी गॅस लाइटिंगचा वापर केला जातो.
आपलीच बुद्धी, हुशारी, आपल्या संवेदना, आपले हसणे – रडणे भावना सुद्धा दुसऱ्याच्या अधीन होतात की तो आपल्याला आपण चुकत आहोत म्हटले तरी ते आपल्याला खरे वाटते, माझेच काही चुकले का, मीच गुन्हा केला, मीच विचित्र आहे, मी असे करायला नको होते, मीच चुकीचा आहे, तसेच समोरचाच बरोबर आहे हेच मनावर बिंबले जाते.

गॅस लाइटिंग कायम ठरवून किंवा नियोजन करूनच असेल असे नाही. अनेक लोकांचे स्वभाव दुसऱ्याचे खच्चीकरण करणारे, दुसऱ्याशी तुसडेपणाने वागण्याचे असतात. अनेक लोकं आपला धाक, दबदबा, भीती समोरच्याला राहावी म्हणून सुद्धा खूप कठोर वागतात. अनेकांना आपल्या बोलण्यातून इतरांवर दडपण टाकणे, इतरांना कमी लेखणे हे उपजत असते. अशावेळी आपण हे गॅस लाइटिंग आहे असे निर्विवादपणे म्हणू शकत नाही, त्यामुळे आपल्याबाबतीत नेमके काय होत आहे, कोण आपल्याशी कसे आणि का वागत आहे हे वेळोवेळी पडताळून पाहणे गरजेचे आहे.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -