
शिवसेना निकालाची होणार पुनरावृत्ती?
मुंबई : जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडली आणि राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवार यांच्यातील संघर्ष वाढत गेला. यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न उभा राहिला. याबाबत काहीच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निकाल देत खरी राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचे सांगत राष्ट्रवादी पक्ष व घड्याळाचे चिन्ह अजितदादांना बहाल केले.
यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची (MLA Disqualification case) सुनावणी प्रतिक्षेत आहे. शिवसेनेप्रमाणे याही प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narewekar) यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेला दिलेल्या निकालाप्रमाणेच राष्ट्रवादीबाबतचाही निर्णय येतो का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दोन्ही गटांकडून आपआपली मते मांडण्यात येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकांनी म्हटले की, १५ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यास १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणानंतर लवकरच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर देखील येत्या काही दिवसांत निकाल लागेल, अशी चिन्हे होती. त्यानुसार उद्याच हा निकाल हाती येणार आहे.