लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे, हे नव्याने सांगायला नको. लाखो मुंबईकरांचा प्रवास लोकलवर अवलंबून आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करीत असतात. सकाळ व संध्याकाळच्या वेळेत लोकलला भयानक गर्दी असते. अनेकजण दरवाजातून लटकत प्रवास करतात, त्यामुळे कधी कधी अपघात घडण्याचाही धोका असतो. लोकलवरील गर्दीचा भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना आखल्या असल्या तरीही ही गर्दी काही कमी होताना दिसत नाही. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज आहे, जेणेकरून वेळेवर लोकल धावल्यास मुंबईकरांचा बहुमूल्य वेळ वाचेल. त्यात तीन दिवसांपूर्वी मोटरमनच्या मृत्यूचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला दिसला. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर अनेक लोकल रद्द करण्याची वेळ आली होती. यामुळे मुंबईतील अनेक प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना तासनतास रेल्वे स्टेशनवर उभे राहावे लागल्याचे चित्र होते.
मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी प्रगती एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आदल्या दिवशी घडली. त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्काराच्या वेळी सहकारी मोटरमन सहभागी झाले होते. मात्र, मृताच्या कुटुंबातील सदस्यांना येण्यास विलंब झाल्याने मोटरमनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सायंकाळ झाली. त्यामुळे कामावर असलेल्या मोटरमनला ड्युटीवर पोहोचता आले नाही. परिणामी, अनेक लोकल गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे शनिवारी मुंबईतील अनेक प्रवाशांचे हाल झाले होते. दरम्यान, यावेळी काही प्रवाशांनी जीव धोक्यात घालूनही प्रवास केला. एकीकडे रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नव्हती, असा आरोप प्रवासी करीत होते, तर दुसरीकडे रेल्वेकडून संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, मध्य रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे शनिवारी लाखो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
रोजच्या लोकल प्रवासाला लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट ते तिप्पट अवधी लागला. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि लोकल सेवा सुरळीत होण्यासाठी मोटरमन आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोटरमनने ‘असहकार चळवळ’ आंदोलन मागे घेतले. अतिरिक्त तास (ओव्हर टाइम) न करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला. यामध्ये मोटरमनच्या मागण्यांबाबत तसेच मोटरमनने धोक्याच्या स्थितीत सिग्नल ओलांडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्यास त्यांच्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई केली जाते, याबाबत चर्चा करण्यात आली. मोटरमनच्या मागण्या रेल्वे मंडळापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी १५० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या, तर ३०० हून अधिक फेऱ्यांना विलंब झाला.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई लोकलवर ताण वाढत चालला आहे. या ताणाचा परिणाम इथल्या वाहतूक सेवेवर देखील होत आहे. दुसरीकडे या गर्दीला आवरण्यासाठी वाहतूक व्यवस्था देखील अपुरी पडत आहे. त्यामुळेच मुंबईकरांची लाइफलाइन समजली जाणारी मुंबई लोकल अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, मुंबई रेल्वे विकास महामंडळ यंत्रणांनी एकत्र येत प्रयत्न केले जात आहेत, तसेच गर्दीतून प्रवाशांची मुक्तता व्हावी यासाठीही शून्य मृत्यू मोहीम देखील राबविण्यात येत आहे. मात्र, मृत्यूसत्र थांबताना दिसत नाही. मुंबई उपनगरीय लोकलच्या गर्दीमुळे जानेवारी महिन्यात एकाच दिवसात तब्बल चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कल्याण ते ठाणे दरम्यान बुधवारी गर्दीच्या वेळी या मृत्यूची नोंद झाली होती. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन ठरलेली लोकल सेवा मुंबईकरांसाठी असुरक्षित ठरू लागली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वे अपघातांत घट झाली असली तरी उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे अनेकांना अद्यापही आपला जीव गमवावा लागत आहे.
तसेच, लोकलमधील सध्याची गर्दी हा चिंतेचा विषय आहे. ट्रेन चुकू नये म्हणून दरवाजाबाहेर लोंबकळत असलेल्या लोकांचे व्हीडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई लोकलमध्ये सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत प्रचंड गर्दी असते. रेल्वेत शिरण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण दरवाजावर लटकून प्रवास करतात. गर्दीमुळे दरवाजावरील प्रवासी बाहेर फेकले जातात आणि त्यात अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागतो. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवरील लोकल १० ते २० मिनिटांनी आणि एक्स्प्रेस ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवरील लोकल अनेकदा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतात.लोकल रद्द झाल्याचेही वारंवार ऐकायला मिळते. त्यामुळे प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो.
लोकलची गर्दी कमी व्हावी यासाठी मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल केले होते. त्यानंतरच आता याला व्यापक स्वरूप यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये रेल्वेने मुंबईतील सरकारी, निमसरकारी कार्यालयांसह ३५० संस्थांशी पत्रव्यवहार करून कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत विनंती केली होती; परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने दिसून येते. त्यामुळे, दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या वेळेची बचत कशी करावी, याचा सखोल विचार करण्याची गरज आहे.मुंबई महानगरात रोज ७५ लाखांपेक्षा जास्त लोक लोकलने प्रवास करतात. त्यांची रोजीरोटी लोकलवर अवलंबून आहे. मग उपनगरीय रेल्वे गाड्या वेळेवर धावत नसतील, तर ती जबाबदारी कोणाची?
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…