सुलतानपूर : प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री विजयालक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत (Mallika Rajput) हिच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला आहे. मल्लिकाने तिच्या सुलतानपूर येथील घरात आत्महत्या केली, असे म्हटले जात आहे. परंतू मल्लिकाच्या मृत्यूचे कारण अजून अस्पष्ट आहे.
पोलिसांनी मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मल्लिकाची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितले की, विजयालक्ष्मी सिंह उर्फ मल्लिका राजपूत ही नेहमीप्रमाणे रात्री खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला. दरवाजा बंद होता पण रुममधील लाईट सुरु होती. आम्ही तीन जणं तिथे होतो पण आम्हाला दरवाजा उघडता आला नाही. शेवटी मी खिडकीतून पाहिले तर तेव्हा माझी मुलगी मला लटकलेली दिसली. मी माझ्या नवऱ्याला आणि इतर काही लोकांना सांगितले. पण तोपर्यंत मल्लिका आम्हाला सोडून गेली.”
मल्लिका राजपूतने अभिनेत्री कंगना राणौतसोबतही काम केले आहे. कंगनाच्या रिव्हॉल्वर रानी या चित्रपटात मल्लिकाने सहाय्यक भूमिकेत काम केले. गायक शानच्या यारा तुझे या म्युझिक अल्बममधून मल्लिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय मल्लिकाने अनेक मालिका, अल्बम आणि मालिकांमध्येही काम केले आहे.
मल्लिका राजपूतने भाजपामध्ये प्रवेश केला होता. पण २०१८ मध्ये तिने राजकारणाला रामराम ठोकला होता.