Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीअटल सेतूवरून धावणार एनएमएमटीची बस

अटल सेतूवरून धावणार एनएमएमटीची बस

प्रवाशांसाठी नेरूळ ते मंत्रालयदरम्यान होणार बससेवा उपलब्ध

मुंबई : अटल सेतूवरून प्रवास करणे हे सर्वसामान्यांचे स्वप्न आहे. अटल सेतूवरुन प्रवास करण्यासाठी स्वमालकीच्या वाहनातून प्रवास करा अथवा खासगी वाहनातून प्रवास करा, त्याकरता टोल भरण्यासाठी स्वत:च्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे. परंतु आता सर्वसामान्यांना अटल सेतूवरून दररोज प्रवास करणे शक्य होणार आहे. तेही अवघ्या ९० रुपयांमध्ये. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची बससेवा ही नेरूळ ते मंत्रालय सुरु होत आहे. ही बससेवा अटल सेतूवरुन चालविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच अटल सेतूवरुन प्रवास करण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न साकार होणार आहे.

एनएमएमटी उपक्रमाने नेरूळ ते मंत्रालय व्हाया अटल पुल अशा प्रकारे सार्वजनिक वाहतुकीतून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. १२ जानेवारी २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर या पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर फक्त खासगी वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लवकरच नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाकडून बससेवेचा प्रारंभ होणार आहे. अटल सेतूवर बसेस किंवा बेस्ट वाहतुक सुरू व्हावी याची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा आहे. एनएमएमटी अटल सेतुवर धावणार हे वृत्त येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सेवेसाठी बस क्रमांक ११५ प्रवाशांना खारकोपर बेल्ट आणि उल्वे या मार्गावरुन नेरुळ ते मंत्रालयापर्यंत असेल. त्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकरांना देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावरून प्रवास करणे शक्य होणार आहे.

५२ किमीच्या प्रवासासाठी ९० रुपये होणार खर्च

एनएमएमटीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस क्रमांक ११५ वातानुकूलित असून खारकोपर ते मंत्रालयपर्यंत आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार ही बससेवा आता नेरुळहून सुरू होईल आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे मुंबईत पोहोचेल. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नगर प्रशासनाने नेरूळ ते मंत्रालय या ५२ किमीच्या प्रवासासाठी सध्याचे भाडे ९० ठेवण्यात आले आहे. सध्या या मार्गावरून सकाळी २ आणि सायंकाळी २ अशा चार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -