केशवस्मृती नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, पनवेल

Share

सेवाव्रती: शिबानी जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माननीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे १९८८ साली जन्मशताब्दी वर्ष होते आणि त्या वर्षी उत्स्फूर्तपणे देशभरातल्या सर्व संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या स्मृितप्रीत्यर्थ काही ना काही सेवा उपक्रम योजना हाती घेण्याचे ठरवले होते. त्यावेळी पनवेलमधील बा. द. जोशी, विजय भिडे, डॉ. प्रभाकर पटवर्धन, दिनेश किणी अशा काही कार्यकर्त्यांनीही काही ठोस कार्य पनवेलमध्ये उभे करण्याचे योजले होते.  ३५ ते ३६  वर्षांपूर्वी पनवेल शहरात आता आहेत त्याप्रमाणे बँकांचे जाळे पसरलेले नव्हते. एखादी राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा पनवेलमध्ये होती आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना आपल्या अडीअडचणींसाठी तसेच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळणे ही गोष्ट दुरापास्त होती.

तसेच मुंबई जवळ असल्यामुळे पनवेलची लोकसंख्याही वाढत होती. या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्वसामान्य माणसांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या घरगुती अडचणी सोडवता येतील, त्यांचा सामाजिक स्तर उंचावेल, त्याला  उद्योगधंदा सुरू करून ताठ मानेने समाजाच्या इतर घटकांबरोबर चालता येईल या विचाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी बांधिलकी मानणारे त्यागी व सेवाभावी वृत्तीच्या कार्यकत्यांच्या विचारमंथनातून पतपुरवठा करणारी संस्था स्थापन करण्याचे निश्चित झाले आणि त्यानुसार त्याच वर्षी  माननीय केशव हेडगेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केशवस्मृती नागरी सहकारी पतपेढी मर्यादित या नावाने ५ नोव्हेंबर १९८८ या दिवशी संस्थेचा शुभारंभ झाला व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या वाटचालीस प्रारंभ झाला.

१९९२ साली संस्थेला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकृत वीज देयके स्वीकृती केंद्र म्हणून मान्यता मिळाली. महाराष्ट्रात सर्वप्रथम अशी मान्यता मिळालेली  ही  पतसंस्था होती.  पनवेल शहर व परिसरातील नागरिकांचा वीज बिल भरण्याच्या निमित्ताने संस्थेतील वावर वाढला. तत्कालीन संचालक मंडळ, कर्मचारी व ग्राहक यांच्यातील सुसंवादामुळे परस्परांमधील विश्वासाची भावना वाढीस लागली आणि संस्थेच्या व्यवसाय वाढीला सुरुवात झाली. तत्कालीन संचालक मंडळाने  अनेक महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी निर्णय घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व चक्रवाढ व्याजाच्या बोजाने वाकलेल्या होतकरू, प्रामाणिक व्यक्तींना संस्थेने कर्जपुरवठा केला. त्यांनीही उत्तम व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या ते सबल झाले. ज्येष्ठ व्यक्तींचा विचार करून काही आर्थिक सहाय्य व्हावे या भावनेने त्यांच्या ठेवींवर अधिक व्याजही देऊ केले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकही संस्थेच्या जवळ आले. सुरुवातीला पतपेढी भाड्याच्या जागेत सुरू होती. हळूहळू व्यवसायात यश मिळत गेल्यानंतर १९९८ साली संस्थेने  स्वमालकीच्या वास्तुत पहिली शाखा सुरू केली. त्यावेळी संस्थेच्या ठेवी  साधारण २ रु. कोटी  रुपये व कर्जे ०.८४ कोटी रुपये एवढे होते.

पनवेल शहरात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे स्थानिक लोकांच्या सुविधेसाठी आणखी शाखा सुरू करण्याचा संघटनेने विचार केला आणि २००१ मध्ये दुसरी शाखा नवीन पनवेल येथे  सुरू झाली. त्या काळात दूरदर्शनवर महाभारत ही मालिका लोकप्रिय होती. संस्थेचे प्रामाणिक काम लक्षात घेऊन या शाखेचे उद्घाटन करायला सिनेकलाकार व महाभारत मालिकेतील श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा साकारलेले नितीश भारद्वाज आले होते व प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारतीचे  सतीशजी मराठे व उदयजी जोशी उपस्थित होते.

पनवेलचा विस्तार झपाट्याने होऊ लागल्यावर आणखी एक शाखा स्थापन करून स्थानिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे ठरले आणि  २००६ साली सेक्टर तीनमध्ये रिद्धी – सिद्धी रेसिडन्सी इथे स्वमालकीच्या वास्तूत शाखा सुरू झाली. या शाखेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेमाट्य कलाकार प्रमोद पवार लाभले होते व प्रमुख वक्ते म्हणून मुकुंदराव गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाला गिरीशजी तुळपुळे, सहकार भारतीचे उदयराव जोशी व बाळासाहेब पाटील उपस्थित होते. अशा प्रकारे संस्थेने आतापर्यंत स्वमालकीच्या वास्तूत सर्व सुविधांनी युक्त अशा ३ शाखा आणि मुख्य कार्यालय ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे.स संस्थेने पनवेल शहरात अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असे मुख्य कार्यालय व प्रशिक्षण केंद्र २०१३ साली त्या वेळचे वित्तमंत्री  सुधीरभाऊ मुनगंटीवार,  राज्यमंत्री विजयजी शिवतारे तसेच पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर व विवेकजी पाटील यांच्या उपस्थितीत ग्राहकांच्या सेवेत दाखल केले.

विद्यमान अध्यक्ष अमित ओझे व त्यांचे सर्व सहकारी, संचालक यांनी काळाची पावले ओळखून आधुनिक तंत्रज्ञान पतपेढीमध्ये आणले आहे. संस्थेचे सर्व कामकाज संगणकीकृत, सुशिक्षित आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्ग, पारदर्शक कामकाज, विनम्र व तत्पर ग्राहकसेवा, कामकाजात व्यवसायभिमुखता आणली गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्वरित सेवा देता येते. संस्थेच्या दैनंदिन कामाकाजात संचालक मंडळाचा कमीत कमी हस्तक्षेप असतो. त्यामुळे कामकाज पारदर्शक आणि त्वरित व्हायला मदत होते. व्यवसाय वृद्धीकरिता निरनिराळ्या आकर्षक कर्ज योजना, ठेव योजना, कर्जदाराला कर्जफेड सुलभ करता यावी  याकरिता स्वल्पबचत योजना राबवल्या जातात. प्रतिनिधींमार्फत रोजच्या रोज कर्जवसुलीसाठी प्रयत्न केले जातात.

सर्वसामान्य भगिनी वर्गाला सोन्याचे आकर्षण असते आणि सोन्यात गुंतवणुकीकडे आजही आपल्या समाजाचा कल आहे, हे पाहून  ग्राहकांना सुलभ हप्त्यांद्वारे २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची खरेदी शक्य व्हावी याकरिता कांचनमुद्रा ही नावीन्यपूर्ण कर्जयोजना सुरू केली आहे. त्याचबरोबर  बँकिंग क्षेत्रात आलेले कोअर बँकिंग तंत्रज्ञानही संस्थेने ग्राहकांसाठी २०२१-२२ मध्ये सुरू केले आहे. त्यामुळे संस्थेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्राहकांच्या सुविधेकरिता डिमांड ड्राफ्ट काढण्याची सुविधा, एस.एम.एस.द्वारे विविध योजनांची व ठेवींच्या मुदतपूर्णतेची माहिती अशा सेवा उपलब्ध केल्या आहेत. तसेच ब्रॉडकास्टिंग ग्रुपद्वारे ग्राहकांना विविध कर्ज, ठेवी योजना, संस्थेचे कार्यक्रम किंवा विविध उपयोगी माहिती दिली जाते. अशा रीतीने केशवस्मृती पतसंस्था ही रायगड जिल्ह्यातील एक अग्रगण्य पतसंस्था  मानली जात आहे.

संस्थेचे मुख्यालय आणि तीन शाखा  स्वमालकीच्या असून त्याचे आजचे अंदाजित बाजारमूल्य ८ कोटी रुपये  आहे. संस्थेला सातत्याने ऑडिट अ वर्ग प्राप्त झाला आहे. आयएसओ मानांकन हे एखाद्या कामाचा दर्जा आणि विश्वसनीयता दर्शवणारे मानांकन आहे. हे मानांकन सुद्धा या पतपेढीला मिळाले आहे. हे मानांकन मिळविणारी केशवस्मृती ही पनवेल शहरातील पहिली पतसंस्था आहे. केशवस्मृती पतसंस्था जरी आर्थिक क्षेत्रात काम करणारी संस्था असली तरी  निव्वळ नफा मिळवणे हा एकमेव उद्देश संस्थेचा कधीच नव्हता. आपण ज्या समाजात राहतो त्याचेही देणे लागतो, हे लक्षात घेऊन समाजात होत असलेल्या सामाजिक कामांनाही खारीचा हातभार संस्था लावत असते.

सामाजिक जाणिवेतून संस्थेने आजपर्यंत अनेक सेवाभावी संस्था/कार्यकर्ते यांना आर्थिक पाठबळ पुरवून त्यांना सन्मानित केले आहे. त्यात प्रामुख्याने डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय, वनवासी कल्याण आश्रम, कुष्ठरोग निवारण समिती, वात्सल्य ट्रस्ट, सत्कर्म श्रद्धाश्रय, केतन करुणेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, कै. रामचंद्र कुरुळकर आदिवासी/मतिमंद निवासी विद्यालय, अंत्यविधी सेवा संस्था, रमाबाई आबेडकर वसतिगृह – विंधणे इ. अनेक संस्थांचा समावेश आहे. त्याचबरोबर संस्थेने पनवेल शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर शिल्पाचे सुशोभीकरण, विविध रस्त्यांचे नामफलक, काही छोट्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण अशा सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर गुजरात भूकंप, कारगील निधी, दुष्काळग्रस्तांकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे.  २००५ च्या महापुराच्या तडाख्याने बाधित झालेल्या संस्थेच्या ग्राहकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला.  २०२० च्या कोविड काळात संस्थेचे काही ग्राहक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले होते. त्यांना कर्जपुरवठा करून, काहींना वाढीव कर्ज देऊन त्या काळातील परिस्थितीवर मात  करायला मदत केली होती.

संस्थेच्या ३५ वर्षांच्या वाटचालीत संस्थेला अनेक मान्यवर व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहन भागवत, कै. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, वेदप्रकाश गोयल, जगन्नाथ पाटील, माजी आमदार बाळ माने, सतीश मराठे, सिनेकलाकार रवी पटवर्धन इत्यादी अनेक मान्यवरांनी संस्थेचे कार्य पाहण्यासाठी संस्थेला भेट दिली आहे. २०२३ अखेर १०००० ग्राहक संख्या झाली असून संस्थेचा एकूण व्यवसाय १५५ कोटींपर्यंत पोहोचला आहे. समाजाचे बदलत स्वरूप, गरजा पाहून तसेच येणारे नवनवीन तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी पतपेढीला आपले कार्यक्षेत्र  सातत्याने वाढत ठेवायचे आहे.
joshishibani@yahoo. com

Recent Posts

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

2 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

2 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

2 hours ago

Worli Hit and Run : ‘कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी!’ गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…

3 hours ago

Dombivali Fire : डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! सोनरपाड्यात कारखान्याला भीषण आग

परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…

3 hours ago

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

4 hours ago