नाशिक पंचवटी(सत्यजीत शाह) – पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यात गोदा आरती वरून सुरू असलेला वादात माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी मागील आठवड्यात भाग घेतला. त्यांनी गुप्त बैठक घेऊन ग्रामसभा घेणार असल्याचे ठरवले होते. त्यानुसार सोमवारी रामकुंड जवळ असलेल्या कार्यालयात साधू, महंत व नाशिककरांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पाडली. गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघच आरती करणार यावर ठाम राहत भविष्यात या विषयावर कोणतीही बैठक होणार नाही.तसेच जर राम तीर्थ समितीने आरतीचा हट्ट सोडला नाही राहिली तर साधू, महंत लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा निर्वाणीचा इशारा दिला. ह्यावरून गोदावरी आरतीसाठी साम दाम दंड भेद हे तत्त्व वापरले जाते की काय ? अशी चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीचा इतिहास हा पुरातन असून हा इतिहास जगासमोर येण्यासाठी वाराणसी, हरिद्वार आणि काशी येथील गंगा आरतीच्या धर्तीवर नाशिकच्या गोदावरी नदी ची महाआरती करण्यासाठी राज्य सरकारने १० कोटींचा आराखडा तयार केला आहे. ह्या साठी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती तयार करून शासकीय अधिकारी, नाशिककर आणि पुरोहित संघाच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. गोदा जन्मोत्सवाचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने या महाआरतीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रामतीर्थ सेवा समिती तर्फे करण्यात येणाऱ्या महाआरती विरोधात पुरोहित संघाने दंड थोपटले असून या समिती मुळे पुरोहित संघाच्या हक्कांवर गदा येणार ह्यासाठी हा विरोध होत आहे . हा विवाद संपुष्टात आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी समन्वय साधण्यासाठी साधू-महंत, पुरोहित आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती सदस्यांची पंचमुखी हनुमान मंदिरात एकत्रित बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, त्यातही कुठलाही ठोस तोडगा निघाला नव्हता.
सोमवारी १२ फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ही ग्रामसभा रामकिशोरदास शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविक पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष तथा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सहसरचिटणीस यांनी केले.माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातून तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून सोळा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पुरोहितांना आरती करिता सोहवळे, लाऊडस्पीकर, स्टेज आणि पुजेचे साहित्य देण्यात आले होते.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला शासकीय मान्यता मिळालेली नाही. गोदावरी आरती करता समितीच्या काही सदस्यांनी भेट घेतली. त्यावेळी पुरोहितांचा अधिकार हिसकावून घेऊन नये असे सांगत गोदावरी नदीच्या इतर कामासाठी समितीने पुढाकार घ्यावा असे बाळासाहेब सानप यांनी सांगितले.
यावेळी बोलताना महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितले की, गोदा आरती मध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती निर्माण करण्यात आल्याचा आरोप करत समिती बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. तसेच या समितीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यापुढे कुठलीही सभा, बैठक घेणार नसून आरतीचा घाट घालण्याचा प्रयत्न केल्यास हातात लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. त्यामुळे भविष्यात ही लढाई रस्त्यावर लढली जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
या ग्राम सभेला महंत रामकिशोर दास शास्त्री महाराज, महंत भक्ती चरण दास महाराज,महंत राजारामदास महाराज, महंत संतोकदास महाराज, कैलास मठाचे ब्रह्मचारी महाराज, महंत रामतीर्थ महाराज, महंत सुधीर पुजारी, महंत रामस्नेहीदास महाराज, महंत पितांबरदास महाराज, महाव्रत स्वामी, सतिश शुक्ल, माजी आ. बाळासाहेब सानप आदींसह सार्वजनिक मित्र मंडळ, शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी, सकल हिंदू समाज, साधू-महंत यासह नागरिक उपस्थित होते.
सभेसाठी आलेल्या नागरिकांनच सभेचा विषय माहीत नव्हता. परिसरातील व्यावसायिकांना समितीकडून हटवले जाणार असून परिसर मोकळा करण्यात येणार असल्याचे सांगत सभेला उपस्थित राहण्याचे सांगितले असल्याचे काही उपस्थित नागरिकांनी सांगितले.