पंतप्रधान मोदींनी केली ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’ची घोषणा
नवी दिल्ली : सौरऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करत असल्याची घोषणा मंगळवारी केली. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देऊन एक कोटी घरांना वीज देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
पंतप्रधानांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ही घोषणा केली. ‘शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहोत. या प्रकल्पात ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. मोदी म्हणाले की, योजना तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
In order to further sustainable development and people’s wellbeing, we are launching the PM Surya Ghar: Muft Bijli Yojana. This project, with an investment of over Rs. 75,000 crores, aims to light up 1 crore households by providing up to 300 units of free electricity every month.
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2024
या योजनेच्या अंमलबजावणीमुळे लोकांचे उत्पन्न वाढेल, वीज बिल कमी होईल आणि रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगत सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘PMSuryaGhar.gov.in’ वर अर्ज करून सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ‘पीएम सूर्या घर मोफत वीज योजना’ बळकट करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा कराल?
या नवीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तुम्ही नोंदणी करताच तुमचे स्वतःचे खाते तयार केले जाईल. तुम्हाला तेथे लॉग इन करावे लागेल आणि वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांसारखी आवश्यक माहिती विचारली जाऊ शकते, जी तुम्हाला अपलोड करून सबमिट करावी लागेल. यानंतर तुम्हाला सरकारकडून नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल, जे तुमच्या परिसरात उपलब्ध आहेत. यादीतील विक्रेता निवडल्यानंतर, तुमचा अर्ज मंजुरीसाठी डिस्कॉमकडे पोहोचेल. डिस्कॉमकडून मंजुरी मिळताच, तुम्ही सोलर प्लांट बसवू शकाल. सोलर प्लांट बसवताच, तुम्हाला प्लांटचा तपशील अधिकृत वेबसाइटवर सबमिट करावा लागेल आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल. तुम्हाला फक्त पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागेल.
या योजनेचा लाभ फक्त भारतीयांनाच मिळणार आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १ किंवा १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे. अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा.
या योजनेतील लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.