Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीशिळफाटा जंक्शनवरील उड्डाणपुलाच्या पनवेलच्या दिशेने जाणा-या मार्गिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...

शिळफाटा जंक्शनवरील उड्डाणपुलाच्या पनवेलच्या दिशेने जाणा-या मार्गिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

उड्डाणपुलामुळे जेएनपीटी आणि ठाणे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार

मुंबई : शिळफाटा जंक्शनवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पनवेलकडे जाणाऱ्या या उड्डाणपुलाच्या या भागात ३ मार्गिका असून मुंब्रा दिशेला जाणारी बाजू सुमारे पुढील दोन महिन्यात खुली करण्यात येईल.

या उड्डाणपुलावर एकूण ३+३ मार्गिका असून त्यांची एकूण रुंदी २४ मीटर आहे. पुलाची एकूण लांबी ७३९.५ मीटर आहे. पुलाच्या व्हायाडक्टची लांबी ३०० मीटर आहे. तर मुंब्रा बाजूकडे (ए१) आणि पनवेल बाजू (ए२) कडे जाणारी मार्गिका अनुक्रमे २७१.५ मीटर आणि १६८.० मीटर लांबीच्या आहेत.

या पुलाच्या निर्मितीसाठी ३० महिन्यांचा कालावधी लागला आहे. सदर प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे ४५.६८ कोटी आहे.

मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडी कमी व्हावी हे एमएमआरडीएचे उद्दीष्ट असून या पुलामुळे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील ठाणे आणि जेएनपीटी दरम्यानची वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल. या मार्गाचा वापर केल्याने प्रवाशांचा वेळ, पैसा आणि इंधनाची देखिल बचत होण्यास मदत होईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी या लोकार्पण प्रसंगी बोलताना म्हटले की, “एमएमआरडीएने वेळोवेळी महत्वाकांक्षी आणि नावीन्यपूर्ण असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. पायाभूत सुविधांचा विकास करत असताना शाश्वततेची कास एमएमआरडीएने धरली आहे. पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास करण्यात एमएमआरडीएने मोठी आणि यशस्वी झेप घेतली आहे. एमएमआरडीएला सातत्याने पाठबळ देणं हे यामुळेच सुखावणारे असून या क्षणाचा साक्षीदार होत असताना मला फार आनंद होत आहे. हा उड्डाणपूल एमएमआर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलाचे लोकार्पण करत असताना मला फार आनंद झाला आहे. मुंबई महानगर क्षेत्राचा शाश्वत विकास व्हावा यासाठी एमएमआरडीए सातत्याने प्रयत्न करत असून या प्रयत्नांना आम्ही सातत्याने पाठबळ देत आलो आहोत याचे मला समाधान आहे.”

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, भाप्रसे, डॉ. संजय मुखर्जी यांनी या निमित्ताने बोलताना म्हटले की, मुंबई महानगर क्षेत्र आणि त्याच्या आसपासच्या भागात एमएमआरडीए विविध विकास कामे करत आहे. या सगळ्या विकास कामांचे उद्दीष्ट हे एकच आहे ते म्हणजे संपूर्ण एमएमआर क्षेत्राचा शाश्वत विकास करणे. त्यामुळे मार्गांची उभारणी करत असताना ती शाश्वत पद्धतीने व्हावी हा आमचा प्रयत्न असतो. राष्ट्रीय महामार्ग ४८ वर उभारण्यात आलेला शिळफाटा उड्डाणपूल हाच दृष्टीकोन ठेवून उभारण्यात आला आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सोबतच इंधनाचीही बचत होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -