अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या (Congress) मोठ्या नेत्यांपैकी एक अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला राम राम केले. तसेच त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
चंद्राशेखर बावनकुळे म्हणाले की, मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही, अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, असे त्यांनी म्हटले.
मोदींच्या विकासाच्या संकल्पाला साथ देणाऱ्यांचे स्वागत
अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझ्याकडे आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही. मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमची विचारधारा स्वीकारत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काहीही बोलणे झाले नाही, माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही.
मोदींचे वादळ महाराष्ट्रात येईल तेव्हा अनेक पक्ष प्रवेश होतील
आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील, सगळ्यांकडे आपली स्ट्रेंथ आहे, त्यांचे एक सीट सहज निवडून येईल. कुठल्याही पक्ष प्रवेशाचा फायदा होतो. प्रत्येकाची क्षमता आहे त्याचा फायदा होईल. मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा अनेक पक्ष प्रवेश होतील. मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे, भाजपला बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज नाही. अजूनही रोज भाजप पक्षात प्रवेश होत आहेत. राज्यसभेची तयारी करण्याची आम्हाला गरज नाही, असंही बावनकुळे म्हणाले.