Monday, December 2, 2024
Homeमहत्वाची बातमीAshok Chavan : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये करणार...

Ashok Chavan : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये करणार प्रवेश

अशोक चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल; कार्यकर्त्यांनीही ठेवले ‘भावी खासदार’ असे स्टेटस

मुंबई : नांदेडमधून एक मोठी बातमी (Nanded News) समोर आली आहे. लोकसभा निवडणुका (Loksabha Election) तोंडावर आलेल्या असताना मोठमोठी नेतेमंडळी काँग्रेसची (Congress) साथ सोडत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत आहेत.

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडे राजीनामा सोपवला. तसेच नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. राज्यसभा निवडणुका (Rajyasabha Election) जवळ आलेल्या असताना भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तसेच, अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत. या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्यासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे.

वाढदिवसानिमित्त घेतली नार्वेकरांची भेट

या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष खिळखिळा होणार

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -