Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Ashok Chavan : प्रत्येक गोष्टीला कारणाची गरज नाही; काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय!

Ashok Chavan : प्रत्येक गोष्टीला कारणाची गरज नाही; काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय!

राजीनाम्याबाबत अशोक चव्हाण स्पष्टच बोलले...


नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेत ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. आजच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडे सुपूर्त केला. तसेच त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्यासोबत आणखी ५ ते ६ आमदार काँग्रसेची साथ सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पुढच्या एक ते दोन दिवसांतच निर्णय जाहीर करेन असं ते म्हणाले आहेत.


अशोक चव्हाण म्हणाले, मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन.


दरम्यान, यावेळी चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्ही भाजपात जाणार का? भाजपा तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यात किती तथ्य आहे? यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला भाजपाची कार्यप्रणाली माहिती नाही. भाजपात जाण्याचा मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन.


काँग्रेस सोडण्याबाबत प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. मी जन्मापासून काँग्रेसचं काम केलं आहे, आता मला वाटलं अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे.” पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला कोणतीही पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही, किवा उणीधुणी सांगायची नाहीत. कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराशी माझं काही बोलणं झालेलं नाही. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी मंत्री असताना भाजपासहित सर्व पक्षांच्या आमदारांना निधी दिला आहे. मी कधीही भेदभाव केला नाही.

Comments
Add Comment