- विशेष : रसिका मेंगळे, मुलुंड
दरवर्षी फेब्रुवारी महिना उजाडला की, तरुणाईला वेध लागतात आणि प्रेमी-प्रेमिकांच्या प्रेमभावना उचंबळून येतात. १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेम आणि आपुलकीचा दिवस. याच दिवशी प्रेमाचा प्रसार करणारे धर्मगुरू संत व्हॅलेंटाइन यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या आठवणीत १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
माणसाचा प्रेमळ स्वभाव आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीच न संपणारे धन असते. आपल्यासाठी कोणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. प्रेमळ लोकांसोबत आहोत. ही गोष्ट फुलांकडून शिकावी. फुलांसाठी कुणीही नसतं पण फुल सर्वांसाठी बहरतं आणि सर्वांना सारखंच सुगंधही देतात अगदी आनंदाने.
प्रेमाच्या दिवसाचं सादरीकरण हा दरवर्षीचा चर्चेचा विषय असतो. कारण प्रत्येकाला प्रेमाचा अधिकार असतो. प्रेम ही संकल्पनाच वैश्विक असल्यामुळे गल्लीपासून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत तिचे सर्वदूर तरंग उमटतात. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम कोणावरही, कशावरही करावे. मात्र त्यात पवित्र भावना जपली गेली पाहिजे. प्रेमासारखी सुंदर गोष्ट कुठलीच नाही. खरं तर आयुष्यातील प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा व्हायला हवा. जगातील प्रत्येक बंधन हे प्रेमाने बांधलेले असते. जर प्रेम नसेल, तर आयुष्यात आनंद येऊ शकणार नाही. तसेच प्रेमाबाबत आपल्या मनातील गोष्टी या समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी कोणताही मुहूर्त नसतो. प्रेमाचा आदर करणे. प्रेमाची भावना हा एक सुंदर अनुभव आहे. आयुष्य जगताना चढउतार येतात. पण त्याग, विश्वास आणि प्रेमाने हे आयुष्य एकत्रितरीत्या निघून जाते आणि त्याच प्रेमाची वारंवार आठवण करून देणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे.
गुलाबी महिन्याचा, गुलाबी प्रेमाचा, गुलाबी दिवस. गुलाबी फुलांचा बोला किंवा आनंदाला उधाण आणणारा दिवस म्हणजेच १४ फेब्रुवारी अर्थात प्रेमाचा उत्सव साजरा करणारा दिवस. पण मंडळी तुम्हाला वाटते का? हे एक दिवस प्रेमाचा दिवस साजरा करून प्रेम वाढेल. नाही ना? कारण प्रेम हे अंतरिक असेल, तरच ते जन्मोजन्मी राहील. आंतरिक भावना सखोल असेल, तरच प्रेम करावे. कारण प्रेम जगणे सुंदर करते. प्रेमाला वयाचे बंधन नसते. प्रेम दोन समंजस व्यक्तीचा आदर करणाऱ्या आणि एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या स्त्री-पुरुषांचे मिलन असते. प्रेम हे ज्या व्यक्तीवर असते तिच्या सुखात सुख, मानायला शिकवते आणि दुःखात सहभागी व्हायला सांगते.
मनुष्य नेहमी कोणाच्या ना कोणाच्या प्रेमासाठी व्याकुळ असतो. प्रेमामुळे माणसाचे जगणे सुसह्य होते. म्हणून कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे… तसे पहिले तर प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. प्रेम एक अनमोल गोष्ट असून ती उपजतच असते. तिला मुद्दाम निर्माण करावे लागत नाही. मानवाला जीवनात ते अतिशय आवश्यकही असते. प्रेमाशिवाय मानवी जीवन वृक्ष व वैराण वाटते.
माझ्या मते प्रेम ही एक सहजसुंदर नैसर्गिक भावना आहे. प्रेम म्हणजे ईश्वर. आपण लक्षात ठेवले पाहिजे की, जगात सर्वत्र ईश्वर प्रेम आहे, म्हणून प्रेम आणि ईश्वर यांच्यात काहीच फरक नाही. पूर्वी प्रेम दाखवले जात नसायचे, पण आता माझे प्रेम किती आहे किंवा मी प्रेमासाठी काहीही करू शकतो. अर्थात स्पर्धा केली जाते. त्या स्पर्धा जर पूर्णत्वास नाही गेल्या, तर त्यातून नैराश्य येऊन व्यक्ती टोकाची भूमिका घेतात. आपले प्रेम त्याच्यावर असले तरी, त्याचे दुसऱ्यावर असू शकते आणि जर दुर्दैवाने तसे निघाले, तर विरहगीत लिहायची तयारी असावी लागते.
हल्ली ३६५ दिवस कोणत्या ना कोणत्या कारणाने साजरे केले जातात. त्यासाठी फक्त १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस एक दिवस साजरा केल्याने होत नाही. माझ्या मते प्रेम म्हणजे तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अर्थात छंदावर करा. प्रेम म्हणजे फक्त व्यक्तीवरच नाही, तर प्रेम प्राणीमात्रांवर, झाडाझुडपांवर, पशुपक्ष्यांवर सुद्धा असू शकते. प्रेम करणे, प्रेम निभावणे, प्रेम तुटणे या एकाच रंगाच्या तीन छटा झाल्यात. जर आपल्याला आयुष्यात खूप पुढे जायचे असेल, काहीतरी बनायचे असेल तर स्वतःवरच प्रेम करा. तोच खरा प्रेमी. कारण खरा प्रेमी आपल्यात असणाऱ्या सौंदर्य, वर्तन, बुद्धिमत्ता, संवाद, लेखन, वाचन, आवाज, कला वागणूक इत्यादींवर भरभरून प्रेम करीत असतो. मानवी हृदय स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करणे इतपत विकसित नाही. कारण प्रेम म्हणजे देणे, प्रेम म्हणजे काळजी करणे, प्रेम म्हणजे सेवा करणे, प्रेम हे सेवेतून विकसित करता आले पाहिजे. म्हातारी माणसे सहानुभूतीसाठी, प्रेमासाठी, स्वाभिमानासाठी तडफडत असतात. त्यांना तुमच्या संपत्तीचा हव्यास नको असतो. म्हातारी माणसे स्वतःच्या स्वाभिमानाविषयी बराच विचार करतात. पण आजकाल हे प्रेम नाही तर कर्तव्य म्हणून दिसून येते.
जीवलग मैत्रीची श्रेष्ठता ही मित्राच्या संकटकाळी दिसून येते. जो मित्राचे, दोषावलोणकर करून त्याचा तोल सावरतो तोच खरा मित्र. रक्ताच्या नात्यापेक्षाही, प्रेमाचे मैत्रीचे नातेे सर्वश्रेष्ठ असते. प्रेमासाठी वाटेल ते म्हणणारे, खूप प्रेम निभवणारे मात्र बोटावर मोजण्याइतपत. प्रेमात पडल्यावर व्यक्तीचा जगण्याचा आनंद द्विगुणित होत असतो. त्याला सर्वत्र प्रेमच प्रेम दिसू लागतं. त्याच्या वागणुकीत फरक दिसून येतो. म्हणतात ना, प्रेमाला उपमा नाही तसेच प्रेमाला मुहूर्तही नाही, कारण प्रेम कधीही, कुणावरही, केव्हाही होत असते. त्यासाठी या स्पेशल दिवसाची गरजच नाही. प्रेम सुंदर बंधन, पवित्र नातं, नाजूक वेल, अतूट धागा आहे. प्रेम ही भावनाच मुळी व्याकुळ करणारी. प्रेमाचा अलगद होणारा शरीराला स्पर्श व्याकुळ करून टाकतो. याच प्रेमाविषयी कवी मंगेश पाडगावकर म्हणतात… “त्याने प्रेम केलं, तिने प्रेम केलं, करू दे… की मला सांगा, त्यात तुमचं काय गेलं…”. पण आजकालचे प्रेम हे इन्स्टंट प्रेम. लगेच कुणावरही आणि ब्रेकअपही लगेच व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे पूर्वीची प्रेमाची संकल्पना आता पाहायला मिळणार नाही. तर प्रेम करा, पण संयम पाळा. म्हणून स्वतःसाठी हक्काचे वेळ राखून ईश्वरावर प्रेम करा. कारण प्रेम हे ईश्वराचं देणं…. कारण प्रेम ही भावनाच सहज सुंदर अनुभव देऊन जाते.