कविता : एकनाथ आव्हाड
उठा मुला थांबून तुला
नाही चालणार
हातपाय गाळून
यश कसे रे मिळणार?
ठेचाळून पडला जरी
जो येतो वाटेवर
त्याच्यासाठी नव्या वाटा
होतात हजर…!
ध्यानात ठेव संकटात
नाही रडून चालत
धाडसाच्या मागे
यश येत असे धावत
या जगी नाही बरं
काहीच अशक्य
वाळवटी नंदनवन
फुलवणेसुद्धा शक्य
माणसाने आकाश
बघ घेतले कवेत
सागराचा तळही कसा
गाठला दमात
केल्याने होत आहे
याचे राहू दे रे भान
यश हे चिकाटीला
चिकटलेले जाण
श्रमाची बांधून पूजा
कर प्रयत्न सत्वर
निराशेच्या काळोखाला
दे लखलखते उत्तर!
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) शेतातून येतो
कारखान्यात जातो
साखर, गुळाचे
रूप नवे घेतो
उन्हाळ्यात रस याचा
लागतो भारी
काविळीवर सांगा बरं
कोण गुणकारी?
२) चौकोनी आकार
पांढराशुभ्र रंग
यांच्याकडे येते बघा
मुंग्यांची रांग
कडू बोलणे त्यांचे
कधीच नसते
चहात, मिठाईत
कोण लपून बसते?
३) दोन पंख, एक शेपटी
पाण्यात त्याचे घर
अंग असते खवल्यांचे
रंगीत नक्षी त्यावर
सुळकन पोहताना
दिसे किती छान
कुणामुळे पाणी
होत नाही घाण?