Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजOld Hindi song : “लम्बी जुदाई...”

Old Hindi song : “लम्बी जुदाई…”

  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

सुभाष घई यांनी केवळ ३ कोटी रुपये लावून काढलेला एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर तब्बल १७ कोटींचा धंदा करून गेला. त्यांनी १९८३ सालच्या या सिनेमाचे नावच ठेवले होते ‘हिरो’! सिनेमा जबरदस्त हिट तर झालाच, पण त्याने जयकिशन श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांना स्टारचा दर्जा मिळवून दिला. सिनेमा इतका लोकप्रिय झाला की अनेक चित्रपटगृहांत ‘हिरो’ दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस सुरू होता. प्रमुख कलाकार होते जॅकी श्रॉफ, मीनाक्षी शेषाद्री, शम्मी कपूर, संजीवकुमार, मदन पुरी, अमरीश पुरी आणि शक्ती कपूर.

तसा ‘हिरो’ या नावाचा अनेकांना मोह पडला होता. अमेरिकी दिग्दर्शक ब्रेट हॅले यांनी २०१७ साली याच (द हिरो) नावाचा सिनेमा काढला होता. त्या हिरोनेही या तरुण दिग्दर्शकाला चांगलेच नाव मिळवून दिले. चिनी दिग्दर्शक झँग यिमाऊ यांनीही २००२ साली चीनच्या प्राचीन इतिहासावर याच नावाचा सिनेमा काढला. त्यात राजेरजवाडे, युद्धे, द्वंद्व-युद्धे असे सगळे होते. याही सिनेमाने चीनमध्ये २००२ साली सर्वात जास्त उत्पन्न मिळवले.

‘अ हिरो’ नावाचा अझगर फरहदी यांचा चित्रपट तर अगदी परवा म्हणजे २०२१ला येऊन गेला. तो इराण आणि फ्रांसमध्ये एकाच वेळी रिलीज झाला होता. अनेक नाट्यमय प्रसंगांनी भरलेल्या या सिनेमाने कान्स फिल्म फेस्टिव्हलपासून वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांत तब्बल १५ आंतरराष्ट्रीय पारितोषिके पटकावली.

हिंदी हिरोची कथा होती पाशा (अमरीश पुरी) नावाच्या एका गँगस्टरने पोलीस अधिकाऱ्यावर उगवलेल्या सुडाची! पाशा त्याच्या टोळीचा सदस्य असलेल्या जॅकीला (जॅकी श्रॉफ) आपल्या अटकेबद्दल पोलीस कमिशनरला भेटून धमकी देण्याची विनंती करतो. जॅकी कमिशनर श्रीकांत माथुरला (शम्मी कपूर) तशी धमकी देऊन थांबत नाही, तर तो शम्मी कपूरची मुलगी राधाला (मीनाक्षी शेषाद्री) पळवून नेतो. आपण पोलीस अधिकारी असल्याचे तो तिला अपहरणाच्या वेळी भासवतो. पुढे तिला सत्य परिस्थिती कळते. पण दरम्यान सहवासामुळे ‘स्टॉकहोम सिंड्रोम’चा प्रभाव पडून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. मीनाक्षी त्याला सगळी वाईट कामे सोडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची अट घालते. ते लगेच शक्य होत नाही. मात्र दरम्यान अनेक गडबडी होऊन जॅकी सुधारतो आणि शेवटी पोलिसांना शरण येतो. पुढे त्यांचे प्रेम सफल होते अशी ही कथा!

सुभाष घईंनी कथा अशी हाताळली होती की, युवावर्गात ती कमालीची लोकप्रिय झाली. निसर्गरम्य स्थळे, मधुर संगीत, देखण्या गुन्हेगारालाच हिरो केलेले कथानक याशिवाय सिनेमाच्या लोकप्रियतेला अजून एक कारण होते. ते म्हणजे त्यातली दोन ‘ऑफ-बीट’ गाणी! एक होते लक्ष्मी-प्यारेंच्या दिग्दर्शनात पाकिस्तानी गायिका रेश्माने गायलेले आनंद बक्षीजींचे “लम्बी जुदाई…” दुसरे अनुराधा पौडवाल आणि मनहर उधास यांनी गायलेले “डिंग डाँग, बेबी सिंग ए साँग…”

पंजाबी ढंगाचा आवाज असलेल्या रेश्माची आणि सुभाष घईंची भेट झाली होती राजकपूरच्या घरी एका पार्टीत. तीही अगदी योगायोगानेच! त्यावेळी नुकतेच भारत आणि पाकिस्तानातील कलावंताच्याबाबत दोन्ही सरकारने नियम शिथिल केले होते. राजकपूरने लगेच त्याचा फायदा घेत पाकमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या रेश्मा या लोकगीत गायिकेला भारतात बोलावले. रेश्मा पाकिस्तानी असली तरी मूळची राजस्थानच्या बिकानेरजवळील एका खेड्यात जन्मलेली बंजारा मुलगी! तिचे कुटुंब फाळणीनंतर पाकमध्ये गेले होते.

सुभाष घईंनी त्या पार्टीत तिने गायलेले गाणे आणि विशेषत: तिचा काहीसा अनुनासिक आवाज इतका आवडला की, त्यांनी फक्त स्टेज शोच करत असलेल्या बऱ्याच लाजाळू रेश्माला सिनेमात गायला राजी केले. ते गाणे म्हणजेच ‘लम्बी जुदाई’!

त्यावेळी अपहरणाच्या गुन्ह्यामुळे जॅकीला तुरुंगवास झालेला आहे. मीनाक्षी एकटीच त्यांच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी आलेली आहे. ती प्रियकराच्या आठवणीत पूर्ण बुडाली आहे. तिथे बसून काही टोळीवाले हे गाणे गात असतात असे दृश्य होते. गाण्याच्या आधीचा शेरही मोठा भावुक होता –

“बिछड़े अभी तो हम, बस कलपरसों,
जियूंगी मैं कैसे, इस हालमें बरसों…”

जणू राधाच म्हणते, ‘मरण आले असते तर कमी वेदना झाल्या असत्या, मला तुझी आठवण त्यापेक्षा जास्त वेदनादायक आहे रे!
“मौत ना आई तेरी याद क्यों आई,
हाय, लम्बी जुदाई…”

आपल्याला इनमीन चार दिवस प्रेमाचे मिळाले आणि अरेरे, लगेच हा इतका मोठा दुरावा, ही ताटातूट!
चार दिनोंदा प्यार, हो रब्बा,
बड़ी लम्बी जुदाई, लम्बी जुदाई… होंठोंपे आई, मेरी जान, दुहाई….
हाय, लम्बी जुदाई…

आता माझा प्रियकर माझ्याजवळ नाही, शिवाय पुन्हा त्याच्या भेटीची शक्यताही नाही आणि त्यात कहर म्हणजे हा वर्षा ऋतू! त्यामुळे जणू माझ्या हृदयात आगच पेटली आहे.
इक तो सजन मेरे पास नहीं रे,
दूजे मिलनदी कोई आस नहीं रे,
उसपे ये सावन आया, आग लगाई!
लम्बी जुदाई…

आमच्या मनात नुकतीच प्रेमाची बाग फुलू लागली होती. या निर्दयी लोकांनी ती पूर्ण फुलायच्या आतच उद्ध्वस्त करून टाकली. प्रेमाच्या आनंदात आमची मने दोन चिमुकल्या पक्ष्यांसारखी बागडत होती. आमचे मिलन होण्याच्या आतच या कठोर समाजाने आम्हाला एकमेकांपासून दूर केले. दु:खी मनाला कोकिळेच्या गाण्याने खरे तर आनंद होतो ना? मात्र आम्हाला, तर तिच्या गाण्याने स्फुंदून स्फुंदून रडूच यायला लागले.
बाग उजड़ गये खिलनेसे पहले,
पंछी बिछड़ गये मिलनेसे पहले,
कोयलकी कूकने हूक उठायी,
हाये! लम्बी जुदाई…

हताश, दु:खी, राधा चिडून देवाला म्हणते, ‘देवा, त्या कठोर लोकांचे हातच तुटून पडोत ज्यांनी आम्हा दोघांची काचेइतकी नाजूक हृदये खळकन फोडून टाकलीत. आमची ताटातूट करून आमच्यात विरहाची उंचच-उंच भिंत उभी करून ठेवली.
टूटे ज़माने तेरे हाथ निगोड़े,
जिनसे दिलोंके तूने शीशे तोड़े,
हिज्रकी उँची दीवार बनायी,
लम्बी जुदाई…

लक्ष्मीकांत प्यारेलालांनी लोकसंगीताच्या जवळ जाणारी चाल देऊन आणि अगदी कमी वाद्यात बसवलेल्या संगीताने गाण्यात विरहाचे दु:ख काठोकाठ भरले होते. आपण समुद्राच्या जवळ बसलो असलो, त्याच्या लाटा एका लयीत येत असतात हे आपल्या लक्षात येते. मात्र एका विशिष्ट वेळाने एक मोठी लाट येते आणि तिचा आवाज इतर लाटांपेक्षा मोठा आणि बराचसा लांब येत असतो. लक्ष्मी-प्यारेंनी ही लाट गाण्यात मिसळून घेतली होती. गाण्याच्या आशयाला त्या लाटेचा आवाज एक वेगळीच गहराई देऊन गेला आहे. त्यात रेशमाच्या काहीशा अनुनासिक आणि अगदी ताज्या-तवान्या आवाजाने तर गाणे खूप हृदयस्पर्शी बनले. ते हिट न होतेच तरच नवल!

काही कलाकृती मुद्दाम निर्माण करता येत नसतात. त्या जन्माव्या लागतात. गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक एखाद्या गाण्याशी समरस झाले तर आपोआप एखादे गाणे कसे अजरामर होऊन जाते त्याचा नमुनाच होती ‘लम्बी जुदाई’! डोळे ओले करणारी पण हवीहवीशी वाटणारी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -