Sunday, October 26, 2025
Happy Diwali

नेट मराठी ओटीटी आता नव्या रूपात; पानसे, गोडबोले यांची नव्या वेबसीरिजची घोषणा

नेट मराठी ओटीटी आता नव्या रूपात; पानसे, गोडबोले यांची नव्या वेबसीरिजची घोषणा
  • ऐकलंत का! : दीपक परब

जगातील पहिले मराठी ओटीटी हा मान मिळवणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’ने आपल्या जगभरातील मराठी प्रेक्षकांना कायमच दर्जेदार कॉन्टेन्ट दिला. अनेक उत्कृष्ट चित्रपट, वेबफिल्म्स, वेबसीरिज, शॉर्ट फिल्म्स त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या. अनेक चित्रपटांनी चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली. आता प्लॅनेट मराठीने पुन्हा एकदा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे आणि याचाच भाग म्हणून प्लॅनेट मराठीच्या डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर अभिजॅत पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत पानसे यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांसाठी लेखन, दिग्दर्शन केले आहे. त्यांची ‘रानबाजार’ या वेबसीरिजने इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजवली होती. प्रेक्षकांसह, शाम बेनेगल, एन. चंद्रा अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या या वेबसीरिजचे कौतुक केले. अनेक धाडसी, ज्वलंत, संवेदनशील विषयांना वाचा फोडणे, ही अभिजित पानसे यांची खासियत. या कारणामुळेच त्यांची कलाकृती ही नेहमीच इतरांपेक्षा हटके आणि सुपरहिट झाली आहे. आता ते प्लॅनेट मराठीसोबत जोडले गेल्यामुळे येत्या काळात प्लॅनेट मराठीचा चढता आलेख पाहायला मिळणार आहे.

याव्यतिरिक्त अभिजीत पानसे यांचे रावण फ्युचर प्रोडक्शन्स आणि श्रीरंग गोडबोले यांचे इंडियन मॅजिक आयने एकत्र येऊन, प्लॅनेट मराठीच्या सहकार्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि भन्नाट घेऊन येण्यासाठीही सज्ज झाले आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच केली असून येत्या काळात प्रेक्षकांना ‘रानबाजार २’ आणि जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ या नाटकावर प्रेरित होऊन एक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या प्रतिभाशाली कलावंतांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या हा प्रयत्न आहे. अशा प्रकारचा मराठीतील पहिला स्टुडिओ उभारण्याचा आमचा मानस आहे. त्यात प्लॅनेट मराठीसारखे व्यासपीठ लाभल्याने हे अधिकच आनंददायी आहे, अशा भावना अभिजीत पानसे यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment