Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमाझं दैवत वात्सल्यमूर्ती...

माझं दैवत वात्सल्यमूर्ती…

  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

गड शिवनेरी छत्रपती. शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन. जुन्नर मातीला शतशः वंदन. या शौर्य, धैर्य, औदार्याने सजलेल्या भूमीत गायकवाड घराण्यात जन्मलेली जयवंतबाई माझी आजी. नुकतीच तिला देवाज्ञा झाली. हे वटवृक्ष कल्पवृक्षासम वात्सल्यसागर, मांगल्य मोती, अलौकिक चहूमुलखी कीर्ती, कर्तव्याचा माप ओलांडून आली. आनंदी, समाधानी, शांत, संयमी वृत्तीची एक योगिनी. उतरत्या वयात सांजवेळी ऐकू येईल, अशी सुंदर तान अन् आयुष्याच्या रूपेरी पुस्तकात सुवर्णअक्षरांनी लिहावे असे सुंदर पान. बाई मंदिराचे पावित्र्य, घराची संस्कृती, मनाची संवेदना, मानवतेचा मान, आदरातिथ्याचा ओलावा, आपुलकी, माणुसकीचा जिव्हाळा, मायेची फुंकर, तृप्तीचा ढेकर, दातृत्वाचा सुगंध, मानवाचा प्रकाश, जिव्हाळ्याचा आकाश, मायेन भरलेलं आभाळ, असं रुबाबदार व्यक्तिमत्त्व.

तिला आम्ही सारे म्हणायचो “बाई! का बरं? तर सासर-माहेरी ती थोरली म्हणून साजेस भारदस्त असं नाव ‘बाई’. सुंदर मनमोहक रूप. तिचं वय वर्षे १०५. उन्हाळे-पावसाळे झेलले, अनुभव पेलले, कर्तृत्व गुणधर्माने सिद्ध झालेलं हे दैवत! शुक्रवारी आमच्यातून ती देवाघरी गेली. त्याग, प्रेम, मांगल्य, सेवा, करुणा, माया दातृत्व इत्यादी मूल्यांचे प्रतीक. चंदनरूपी झिजणारा हा देह. मोठ्या, श्रीमंत मनाचा आदर्शरूपी मंगल कलश, अंगणीची पवित्र तुळस. बाई, तू म्हणजे आमचं वैभव. समृद्धीने खळखळणारे चैतन्य, सचेतन झुळझुळणाऱ्या मायेचा झरा. बाई तू म्हणजे सुखाचा गारवा. आनंदाला उधाण, ममत्व, देवत्वाची साठवण. कर्तृत्व, नेतृत्वाचा, दातृत्वाचा संगम. निर्मोही, नि:स्वार्थी मायेचा उत्तुंग हिमालय, सौहार्द मन. बाई तू म्हणजे आमचं ऐश्वर्य, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला बहाल केलेलं, कर्तव्यनिष्ठा, सद्गुण, जबाबदारी आणि माणुसकीचं सुंदर रूप, ईश्वराचं प्रतिरूप. जिथे जाईल त्याचं सोनं करणारी परीस तू! स्वतःसह आमचेही तू सोनं केलंस अशी लाडकी आमची बाई मेणाहून मऊ, तर कधी वज्राहून कठीण अशी! कधीच कोणालाही दुखावलं नाही!! तिनं दगडमातीवर, शेतावर, पाना-फुलांवर, माणसांवर प्रेम तर केलंच पण भूतदया, प्राणी, पक्षी निसर्गावरही केलं अतिथी देवो भव अशी जीव ओवाळणारी शिवनेरीच्या शिवाईदेवीवर, पीरसाहेब तिची निस्सिम श्रद्धा. शांत, प्रेमळ, कनवाळू, न्यायी सहिष्णू, उद्योगी, सज्जन अशी लाडकी आमची बाई! सगळ्यांचीच आजी जराशा फरकाने अशीच असते नै?

माहेरच्या संस्कारांचं वैभव घेऊन बालपणी आलीस, समुद्रात तुफान वादळे शांतपणे पेलून शिंदे घराण्याचीच झालीस, जीवननौका पैलतीरी लावली, अविचल स्थितप्रज्ञपणे संसाराचे धनुष्य पेलले. कठोर परिश्रमांचे बांधले तोरण. शिंदेशाही कोहिनूर हिरा केले तू नंदनवन. सत्कर्माची तू खाण, तुझा सदैव आम्हा अभिमान, बाई तू महान, तुझ्या संस्कारांची शिदोरी सदैव तुझ्या विचारांसवे हृदयात राहील. “दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती…”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -