Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजMarathi Movie : ‘आता वेळ झाली’; इच्छामरणावर परखड भाष्य

Marathi Movie : ‘आता वेळ झाली’; इच्छामरणावर परखड भाष्य

  • ऐकलंत का! : दीपक परब

सर्वात नावडती आणि अंतिम सत्य कोणती गोष्ट असेल तर ती आहे मृत्यू. अनेकजण या विषयावर बोलणे किंवा मतप्रदर्शन करणे नेहमीच टाळत असतात. पण काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ या चित्रपटाने मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या एका जिंदादिल माणसाची आणि मित्रत्वाची गोष्ट जगासमोर आणली. या चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांना प्रचंड भावला. या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. आजही तो चित्रपट लोकांच्या विस्मरणात गेलेला नाही. आता नामवंत गायक, संगीतकार अनंत नारायण महादेवन हे अशाच धाटणीचा पण इच्छामरण या विषयावरील चित्रपट घेऊन येत आहेत.

अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी असे तगडे कलावंत दिसत आहेत. जीवनाचा शेवट आनंदी व्हावा, असे वाटणाऱ्या प्रत्येक वयस्करांच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे इच्छामरण हा एक असा विषय आहे, ज्याने या महामारीच्या काळात सर्वांना प्रभावित केले. जेव्हा जगाने जीवन आणि मृत्यूकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्यास सुरुवात केली. तरुणाईचाही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. भौतिकवादी दृष्टिकोनापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोनाकडे त्यांचा कल वाढला. हा चित्रपट पाहून वृद्धांच्या मनातील घालमेल तरुणाईला नक्कीच कळेल, असे अनंत नारायण महादेवन यांना वाटतेय. या चित्रपटाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावरून केली आहे.

सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाच्या नावातच सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे, याचे उत्तर २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट आल्यावरच कळणार आहे.
या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिनेश बन्सल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन या चित्रपटाचे निर्माते आहेत. डेल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी ‘आता वेळ झाली’ची यापूर्वीच निवड झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -